नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावत नवा इतिहास रचणारी भारताची फुलराणी सायना नेहवालने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज केले आहे.
जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाला स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतरही तिने दुसर्या स्थानावरुन अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाचा मरिनकडून १६-२१, १९-२१ असा पराभव झाल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
जागतिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी ती भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली. जागतिक स्पर्धेत सायनाला पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा पार करता आला.
२०१२ मधील लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायनाचे क्रमवारीत ८२, ७९२ गुण आहेत. तर ८०, ६१२ गुणांसह कॅरोलिना दुसर्या स्थानी आहे.