नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रात साथीच्या आजारांचा उद्रेक झाल्याने साथींच्या आजारांविषयी नवी मुंबईकरांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती अभियान राबविण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी शुक्रवारी, दि. 21 ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील दिघा ते बेलापुरदरम्यान ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या आजाराचे रूग्ण मोठ्या संख्येने पहावयास मिळत आहे. प्रथम संदर्भ रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, खासगी रूग्णालये, दवाखाने आदींची पाहणी केल्यास रूग्णांची संख्या आजाराची भयावहता स्पष्ट करत आहे. गुरूवार, दि. 20 ऑगस्ट रोजी नेरूळ प्रभाग 87 मध्ये 21 वर्षाचा युवक डेंग्यू आजाराने गमविला आहे. महापालिका प्रशासनाकडून भिंतीपत्रके तसेच प्रभागाप्रभागामध्ये घेतली जाणारी आरोग्य शिबिरे याला मर्यादा पडत असून साथींच्या आजारामुळे जनसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबईकरांमध्ये साथीच्या आजाराविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
गल्लोगल्ली पथनाट्याच्या माध्यमातून आजाराविषयी मार्गदर्शन, घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना याची माहिती घरटी पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच काही रिक्षा संघटनांच्या माध्यमातून, सामाजिक संस्था तसेच महिला बचत गटांच्या सहकार्याने साथीच्या आजाराविषयी आरोग्य विभागाने नवी मुंबईच्या कानाकोपर्यात जनजागृती करण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.