सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : एरोली मधील आय गेट कंपनी समोर शुक्रवारी नवी मुंबई मनसेचे उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली मराठीच्या मुद्यावरुन आंदोलन करण्यात आले. यामध्ये कंपनी प्रशासनाने स्थानिक मराठी भाषिकांना नोकर्या व कंपनीत मराठी नावाची कंपनीची नेम प्लेट नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
गेल्या 20 वर्षापासून ही कंपनी पटनी या नावाने प्रसिध्द होती. पण आता आय गेट या परदेशी कंपनीने ही कंपनीने विकत घेतली असल्याकारणाने त्यांनी पटनी कंपनीचे नाव बदलून आय गेट हे केले आहे. शिवाय या कंपनीत मराठी भाषिकांपेक्षा, केरळ, कर्नाटक व इतर राज्यातील तरुणांची संख्या ही जास्त आहे, तर स्थानिक मराठी उच्च शिक्षितांची संख्या कमी असल्याचा दावा मनसेने केलाय. यामुळे मनसेने शुक्रवारी मनसे स्टाइलने आंदोलन करत कंपनी प्रशासनाला मराठी तरुणांना नोकरीची संधी व आय गेट या नावाची कंपनीत मोठी मराठी पाटी लावण्याची सुचना मनसेने कंपनी प्रशासनाला आपल्या लेखी निवेदनातून केली आहे. यावेळी मनसे शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीप्रसंगी कंपनी व्यवस्थापनाने मराठी तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे मान्य केले असून येत्या काही दिवसात त्या उपलब्ध करुन देण्यात येतील, असे चर्चेप्रसंगी सांगितले.
यावेळी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सांगितले की, आय गेट कंपनी प्रशासनाने स्थानिक नवी मुंबईच्या नागरिकांना प्राधान्य व माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कंपनीत भरती करण्याचे आश्वासन तथा कंपनीवरील इंग्रजी नाव मराठीत करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी रबाले पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी व आय गेट कंपनीच्या सहकर्मचार्यांनी पत्रकारांना कंपनीत येण्यासाठी प्रवेश नाकारला.
या आंदोलनाप्रसंगी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे,उप शहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे , सचिव रविंद्र वालावलकर, कौस्तुभ मोरेे, सेच कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी विजय पंडित, जयदीप चव्हाण, विजय रागों व रबाले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक काटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.