* चित्रा बाविस्करांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार – चौगुले
* चित्रा बाविस्करांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचा इशारा
नवी मुंबई : तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचा प्रस्ताव आणल्याप्रकरणी सभागृहात विरोधी पक्षातील शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांच्या टिकेचे धनी ठरलेल्या महापालिकेच्या प्रभारी सचिव चित्रा बाविस्कर यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात महापालिकेतील विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हातावर काळ्या फिती बांधून आणि काळ्या टोप्या घालून अनोखे आंदोलन छेडले. यावेळी आंदोलनकर्त्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त तसेच महापालिका सचिव कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
20 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या तहकूब सभेमध्ये सचिव चित्रा बाविस्कर यांनी विरोधी पक्षांची मंजुरी न घेताच तातडीचा प्रस्ताव सभागृहाच्या विषय तालिकेवर ठेवला. या प्रस्तावाला विरोधी पक्षांची हरकत असूनही तो सभागृहात मतदानाला टाकला गेला नाही. आणि त्याला मंजुरी देण्यात आली. अशा पध्दतीने सभागृहात प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने त्याने सदस्यांसह सभागृहाचीही दिशाभूल झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केला आहे.
दरम्यान, महापालिका सभागृहात नियमाविरुध्द चाललेल्या गैरकारभाराप्रकरणी सचिव चित्रा बाविस्कर यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करु. तसेच बाविस्कर
यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही चौगुले यांनी यावेळी बोलताना दिला.
वास्तविक पाहता ऐरोली विधानसभा मतदारसंघातील 3 प्रभाग समितींमध्ये शिवसेनेची सत्ता येणार होती. मात्र, याच कारणास्तव सत्ताधार्यांच्या इशार्यावरुन सदर प्रभाग समितींमध्ये फेरबदल करुन त्याचा प्रस्ताव सचिव चित्रा बाविस्कर यांनी विरोधी पक्षांना न देता तो सरळ तातडीचा प्रस्ताव करुन महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला. त्यामुळे महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांच्या या मनमानी कारभाराविरोधात महापालिकेतील विरोधी पक्षांतील शिवसेना नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली 21 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयात काळ्या टोप्या घालून आणि काळ्या फिती बांधून आंदोलन छेडले. यावेळी आंदोलनकर्त्या
नगरसेवकांनी आयुक्त तसेच सचिव कार्यालयाबाहेर बाविस्कर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सत्ताधार्यांच्या पे-रोलवर काम करणार्या बाविस्कर यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी महापालिका
आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले. याप्रसंगी माजी सिडको संचालक नामदेव भगत, नगरसेवक शिवराम पाटील, पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, आदि उपस्थित होते.
***
बाविस्कर दोषी आढळल्यास कारवाई करणार -आयुक्त
दरम्यान, महापालिका प्रभारी सचिव चित्रा बाविस्कर यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी एका समितीची निवड करण्यात आली आहे. या चौकशीत चित्रा बाविस्कर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी आंदोलनकर्त्या
नगरसेवकांना दिले.