डर्बन : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर असलेला वेगाने आठ हजार धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी.डिव्हिलियर्सने मोडीत काढला.
डरबनमध्ये बुधवारी न्यूझीलंड विरुध्दच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात डिव्हिलियर्सने हा विक्रम मोडला. डिव्हिलियर्सने १८२ डावांमध्ये आठ हजार धावांचा टप्पा पार केला. गांगुलीने २०० डावांमध्ये आठ हजार धावांचा टप्पा गाठला होता. गांगुलीपेक्षा १८ आणि सचिनपेक्षा २८ डाव आधी डिव्हिलियर्सने या विक्रमाला गवसणी घातली.
एकदिवसीय सामन्यांमध्ये वेगवान अर्धशतक, वेगवान शतक आणि वेगवान १५० धावांचा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात डिव्हिलियर्सने सनथ जयसूर्याचा १९ वर्षापूर्वीचा कमी चेंडूत अर्धशतक झळकवण्याचा विक्रम मोडला होता.
डिव्हिलियर्सने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. १९९६ मध्ये जयसूर्याने पाकिस्तान विरुध्द १७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. याच सामन्यात डिव्हिलियर्सने ३१ चेंडूत जलद शतक झळकवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
यापूर्वी ३६ चेंडूत जलद शतक झळकवण्याचा विक्रम कोरे अँण्डरसनच्या नावावर होता. याच सामन्यात डिव्हिलियर्सने रोहित शर्माच्या १६ षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. ऑस्ट्रेलिया विरुध्द २०१३ मध्ये रोहितने १६ षटकार ठोकले होते.