सिसिली – लीबियाच्या तटाजवळील भूमध्य समुद्रामध्ये नावांनी प्रवास करत असलेल्या सुमारे तीन हजार निर्वासितांना वाचविण्यात यश आले असल्याचे इटलीच्या तटरक्षक दलाने सांगितले आहे. मात्र अति गर्दीने भरलेल्या या नावांमध्ये किमान ५५ मृतदेह आढळून आल्याचे तटरक्षक दलाने स्पष्ट केले आहे.
या मृतदेहांपैकी ५१ मृतदेह लीबियाच्या तटाजवळ असलेल्या एका लाकडी नावेमध्ये आढळून आले. युरोपिअन युनियनच्या बचाव मोहिमेंतर्गत सहभागी असलेल्या स्वीडनच्या जहाजास हे मृतदेह दिसून आले. या लाकडी नावेवर एकूण ४३९ प्रवासी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
आफ्रिका व पश्चिम आशियामधील अशांततेने ग्रस्त निर्वासित हे युरोपमध्ये पोहोचण्याच्या आशेने छोट्या नावांच्या सहाय्याने भूमध्य समुद्र पार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांत हजारो निर्वासित मृत्युमुखी पडत आहेत. या वर्षी (२०१५) एकूण २३०० निर्वासित या प्रयत्नांत मृत्युमुखी पडल्याचे स्थलांतरितांच्या प्रश्नासंदर्भात कार्य करत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे.