वाशीम : कोकिळा व्रतेची पूजा करून नदीत स्नानासाठी गेलेल्या पाच महिला बुडाल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी ६ वाजताच्या सुमारास गिव्हा येथे घडली. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून, इतर चार महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालताबाई भुसारी (४५) असे मृत महिलेचे नाव आहे.
गिव्हा येथे जलयुक्त शिवाराअंतर्गत चंद्रभागा नदीमध्ये पाणी अडवण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी मुबलक पाणी आहे. सध्या कोकिळा व्रत सुरू असल्याने गावातील जवळपास ७० ते ८० महिला रोज पूजा करून या ठिकाणी पवित्र स्नान करायला जातात. त्यापैकी आज सकाळी एक खोल पाण्यात गेली. ही बाब इतर महिलांच्या लक्षात येताच त्याही तिच्या मतदीसाठी पुढे गेल्या. पण, पाणी जास्त असल्याने त्यातील चार महिला बुडायला लागल्या. दरम्यान, नदी काठावर असलेल्या इतर महिलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बाजूच्या शेतात काम करत असलेले पुरुष धावत आले. तोपर्यंत काठावरील महिलांनी बुडत असलेल्या महिलांना बाहेर काढले होते. यापैकी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, इतर चारही महिलांची प्रकृती चिंताजक आहे. लक्ष्मीबाई भुसारी (३८), कमलाबाई भुसारी (४०), रेखा भुसारी (४५) आणि गंगाबाई भुसारी (४५) अशी त्यांची नावे आहेत.