पाटणा : एक दिवसाच्या बिहार दौर्यावर गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी सकाळी पाटणा विमानतळावर उतरताच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळ झेंडे दाखवणार्यांनी ते समाजसेवक अण्णा हजारे यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अरविंद केजरीवाल पाटण्यामध्ये आले आहेत. नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल एकत्र एका चर्चासत्राच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. केजरीवाल यांना या चर्चासत्रांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघांचेही प्रतिस्पर्धी असल्यामुळे नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांच्यात जवळीक वाढली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाने एकही उमेदवार उभा केला नव्हता. उलट जदयूचे नेते आपसाठी प्रचार करत होते. या मदतीची परतफेड म्हणून केजरीवालांनीही दिल्लीमध्ये रहाणार्या बिहारी नागरीकांना जदयूला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांना पाठिंबा देण्याच्या केजरीवालांच्या निर्णयावर योगेंद्र यादव यांनी टीका केली आहे.