नवी मुंबई : पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने यापुढील काळात मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजारांबाबत अधिक गतिमान प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी तसेच वस्ती, सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना या आजारांविषयी व त्याकरीता घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती पुरवून अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि या कामात सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकिय अधिकार्यांनी तेथील स्थानिक नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे अशा सूचना स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के यांनी स्थायी समिती सदस्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या सूचनांवर भाष्य करताना आरोग्य विभागास केल्या.
या चर्चेमध्ये ऍड. अपर्णा गवते, शिवराम पाटील, रविंद्र इथापे, मनोहर मढवी, शंकर मोरे, रामचंद्र घरत, शशिकांत राऊत या स्थायी समिती सदस्यांनी सहभाग घेतला. अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी, शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यादृष्टीने लवकरच स्थायी समिती सदस्यांचा वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयामध्ये पाहणी दौरा आयोजित करण्यात येईल असे सांगत महानगरपालिका रुग्णालयांत जेनेटिक मेडिसीन्स उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना सभापतींनी याप्रसंगी केली. रोगप्रतिबंधात्मक धुरीकरण करणार्या कंत्राटदारांना कालमर्यादित कार्यवाहीची अधिक प्रभावी पध्दत आखून द्यावी असे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयामार्फत हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात येणार्या रुग्णांना कागदपत्रे पूर्तता करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी त्याठिकाणी व्यक्तींची नेमणूक करावी तसेच लोकप्रतिनिधींना महानगरपालिकेच्या रुग्णालयात आदराची वागणूक मिळणेबाबत संबंधितांना निर्देश देण्याचे सभापती सौ. नेत्रा शिर्के यांनी सूचित केले.
या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयांकरीता सर्जिकल साहित्य खरेदी करणेचा प्रस्ताव तसेच महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांत यांत्रिक पध्दतीने साफसफाई करण्याच्या कामास मे ते ऑगस्ट २०१५ या वाढीव कालावधीसाठी मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे से. १०, सानपाडा येथील भू. क्र. १८७ येथे एक मजली समाजमंदीर बांधण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली. १६३८३ चौ. फूट बांधकाम क्षेत्रफळात उभ्या राहणार्या या समाजमंदिराच्या तळमजल्यावर लहान सभागृह व पार्किंग सुविधा तसेच पहिल्या मजल्यावर रंगमंचासह सभागृह सुविधा आणि संग्रहालय व ग्रंथालय सुविधा प्रस्तावित आहे. यामुळे सानपाडा, जुईनगर क्षेत्रातील नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.