मुंबई : स्वच्छ आणि सुंदर मुंबई ही कल्पना फक्त घोषणेपुरती राहिली असून करून दाखवले’ म्हणार्यांनी काही करून तर दाखवले नाहीच, पण स्वतःचे घर मात्र भरून दाखवले, असे टीकास्त्र सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मुंबई महापालिकेच्या तयारीला सुरूवात केली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरूवात केली असून मुंबईतील कार्यकर्त्यांच्या पहिल्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते.
बुधवारपासून या मेळाव्यांना मुंबईत सुरूवात झाली असून पहिला मेळावा वांद्रे येथील महात्मा गांधी सभागृहात पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक, मुंबई महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आसिफ भामला, आ. किरण पावसकर आणि मुनाफ हकिम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्या दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना अहिर यांनी राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, आज राज्यात विरोधी पक्ष कोण आहे तेच कळत नाही. मरिन ड्राईव्हवर एलईडी दिवे लावण्यावरून सेना भाजपमध्ये वाद सुरू आहे. कोस्टल रोडचे अजून कशातच काहीही नसताना त्याला बाळासाहेबांचे नाव देण्यावरून सत्ताधार्यांमध्ये आपापसात वाद आहेत. आघाडी सरकारने राज्यात अन्न सुरक्षा योजना आणली होती. मात्र युती सरकारने ही योजना गुंडाळून ठेवली. सत्ताधार्यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण देताना त्यांनी महापालिका शाळांचे उदाहरण दिले. मुंबईतील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शालेय वस्तू देण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी १६५ कोटींची तरतूद केली जाते.पण जेव्हा आम्ही शाळांना भेटी दिल्या त्यावेळी यापैकी कोणत्याच वस्तू मुलांना मिळाल्या नसल्याचे आम्हाला दिसले, मग ते १६५ कोटी रुपये गेले कुठे याचे उत्तर सत्ताधार्यांनी दिले पाहिजे, असे ते म्हणाले. शिवाय ज्या मुलांना अजुन पायाभूत सुविधा मिळत नाहीत, त्यांना टॅब देण्याचा बालहट्ट का करता? कारण हे टॅब पुरवणारी कंपनी यांच्या खासदाराची आहे म्हणून का? असा सवाल करत मा.अहिर यांनी शिवसेनेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकर्यांना मदत हे सरकार देऊ शकत नाही, मात्र बिहारला पंतप्रधानांनी पॅकेजची घोषणा केल्यावर त्यांनी मुंबईत जल्लोष केला, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे. देशातल्या स्वच्छ शहरांच्या यादीत शेजारच्या नवी मुंबईचा तिसरा क्रमांक येतो, पण एवढे अवाढव्य बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे अस्तित्व कुठे आहे, असा सवालही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. संस्कृतीच्या गप्पा करणारे सत्तेत येताच संस्कृतीची कत्तल करत आहेत, असे भाष्यही त्यांनी सध्या दहिहंडी, गणेशोत्सव, आणि इतर सण सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर आणलेल्या बंधनाच्या मुद्यावर बोलताना केले.
या मेळाव्याला संबोधित करताना सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या हार्दिक पटेलच्या आंदोलनाचे उदाहरण देत छगन भुजबळ म्हणाले की, लोकांचे प्रश्न हाती घेतले की लोक पाठिंबा देतात. एक २२ वर्षांचा पोरगा आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे आलाय. कोणाला पटो वा न पटो पण त्याला जनतेचा पांठिबा आहे.कांदा, डाळी यांच्या महागाई आणि साठेबाजीच्या विरोधातही तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असे ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
महागाईच्या मुद्द्याचा धागा पकडत प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनिल तटकरे यांनीही सरकारवर तोफ डागली. पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी करण्याचे श्रेय भाजप सरकार कसे काय घेते, असा सवाल करत मुंबईतील विधानसभेच्या बहुसंख्य जागा भाजपला मिळाल्या,पण तरीही अन्न सुरक्षा रद्द करणे, एपीएल कार्डधारकांच्या सुविधा बंद करणे आणि केरोसिनमध्ये कपात करणे यासारखे निर्णय घेत भाजपने मुंबईकरांना धक्के दिल्याचा आरोप मा. तटकरे यांनी केला.मा. सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पुन्हा एकदा संघटना मजबूत होईल, असा आशावाद व्यक्त करत आघाडीचा निर्णय होईल तेव्हा होईल पण सर्व प्रभागांमध्ये आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.आज सत्ता जरी आपल्याकडे नसली, तरी राजकीय सिद्धांत, सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष भुमिका आपण कायम ठेवली आहे, असे तटकरे म्हणाले. तर या मेळाव्याला संबोधित करताना महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्ष चित्राताई वाघ म्हणाल्या की, रेल्वे, बस आणि घरात महिला सुरक्षित नाहीत, राज्यातल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे केव्हाच तीन तेरा वाजलेत. महिला अत्याचाराच्या घटना उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही वाढल्याकडे लक्ष वेधले.
*****
आमची चौकशी करणार्यांनी महापालिकेचा लेखापरिक्षण अहवाल काढण्याचे धाडस दाखवावे – सुनिल तटकरे
तुम्ही आमची चौकशी लावलीत हरकत नाही, त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच,पण मुंबई महानगरपालिकेचे लेखापरिक्षण करण्याचे धाडस करुन दाखवा, असे थेट आव्हान मा. तटकरे यांनी सत्ताधार्यांना दिले. हेच आव्हान आम्ही विधीमंडळातही सरकारला दिल्याचे सांगत त्यावेळी राज्य सरकार गप्प बसल्याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.