औरंगाबाद : दिल्लीतील भीषण अशा निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण ताजी करणारी घटना महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये घडली आहे.
सोबत असलेल्या प्रियकराला बेदम मारहाण करुन चौघा नराधमांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडीत तरुणी आणि तिचा प्रियकर एकाच कंपनीत कामाला आहेत. काम संपल्यानंतर दोघेही रात्री आठच्या सुमारास मोटरसायकलवरुन घरी जाण्यासाठी निघाले असता केंब्रीजशाळेपासून बायपास जळगाव रोडकडे शिवनेरी हॉटेलनजीक थांबून ते बोलत होते.
यावेळी दुचाकीवरून चार तरुणांचे टोळके त्यांच्याजवळ येऊन थांबले. निर्जनस्थळी कोणी नसल्याचे पाहून या चार नराधमांनी त्यांना घेरले. त्यानंतर तरुणाला बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत तरुणीला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
पीडीत तरुणीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही गंभीर घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान केंब्रीज स्कूल परिसरात घडली.
दरम्यान पिडीत तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रात्रीच चौघांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. याप्रकरणी, बलात्काराच्या आरोपाखाली चौघांवर कलम 376 (ड) तसेच मारहाण, ठार मारण्याची धमकी, चाकूचा धाक दाखवणे, या कलमांखाली गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.