*** सिडको विरोधात नवी मुंबई काँग्रेसचे मुक निषेध आंदोलन***
** अनंतकुमार गवई **
नवी मुंबई: नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना साडेबारा टक्के भूखंड वाटप पूर्ण न करता फसवणूक करीत नैसर्गिक गरजेपोटी प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या घरांवर कारवाई आणि प्रसंगी पोलिसांत गुन्हे दाखल करणार्या सिडको प्रशासनाविरोधात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाचा निषेध करतानाच नैना प्रकल्पग्रस्त शेतकर्यांमध्ये जागृतीसाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट रोजी वाशीतील एक्झिबिशन सेंटरच्या गेटवर मुक निषेध आंदोलन करण्यात आले.
नागरिकांसह महामंडळाचे हित कसे जोपासतेय ते राज्य आणि केंद्र शासनास दाखवून स्वत:चे प्रमोशन करण्यासाठी सिडको प्रशासन धडपड करीत आहे. ज्याप्रमाणे सिडकोने ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकर्यांना फसविले आहे, त्याप्रमाणे आपण फसू नका, असा सावधानतेचा इशारा नैना प्रकल्पात बाधित होणार्या शेतकर्यांमध्ये जागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे सिडको विरोधात मुक निषेध आंदोलन छेडण्यात आल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले. सिडकोने नैना प्रकल्प बाधित शेतकर्यांच्या/ग्रामस्थांच्या वित्तीय गुंतवणूक विषयक कार्यक्रमास सुरुवात होण्याअगोदर वाशीतील एक्झिबिशन सेंटरच्या प्रवेशद्वारावर सदर आंदोलन छेडल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.
1970 साली ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकर्यांच्या 100 टक्के जमिनी सिडको प्रशासनाने गुंतवणुकदाराच्या मानसिकतेतून अधिग्रहण केल्या. परंत, सिडकोने प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या भविष्यातील होणार्या नैसर्गिक कुटुंब वाढीसाठी इंचभर जागा देखील सोडलेली नाही. प्रकल्प बाधित शेतकर्यांचे पूर्ण पुनर्वसन होऊ नये या आकसापोटी पुनर्वसन प्रक्रियेसाठी जाचक अटी टाकून गुंता निर्माण करीत सिडकोने शेतकर्यांची आजपर्यंत फसवणूक करुन त्यांना उध्वस्त केले असल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी केला आहे.
वास्तविक पाहता जमीन अधिग्रहण करताना देण्यात आलेल्या आश्वासनानुसार सिडकोने प्रथम गावांचा विकास करुन नंतर शहर विकास करायला पाहिजे होता. पण, प्रत्यक्षात सिडकोने त्यांचे ब्रीदवाक्य वुई मेकस् सिटीस् याप्रमाणे वागून सिडको विकसीत शहरातील गावे मागास ठेवलेली आहेत. त्यामुळे आता सिडकोने त्यांच्या मूळ आश्वासनानुसार जे करायला हवे ते वुई डेव्हलप व्हिलेजेस अॅन्ड देन मेकस् सिटीस् यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिडको प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.