नवी मुंबई: सीबीडी बेलापूर, सेक्टर-15 येथे असलेले अनधिकृत ग्लास हाऊस तोडल्यानंतर त्या जागी सिडको आता मेरीटाईम बोर्डाच्या सहकार्याने मरीना नामक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या समवेत 27 ऑगस्ट रोजी पाहणी केली. या पाहणी दौर्यानंतर मरीना प्रकल्पांतर्गत प्रस्तावित सुविधांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. दरम्यान, सदर प्रस्तावित प्रकल्पाला मरीना ऐवजी गोवर्धनी मरीना असे नाव देण्याची मागणी आ. मंदाताई म्हात्रे यांनी संजय भाटिया यांच्याकडे केली.
याप्रसंगी मेरीटाईम बोर्डाचे चिफ इंजिनिअर विजयकर, कार्यकारी अभियंता देवरे, सेफवॉक फाऊंडेशनचे अधिकारी, सिडको-एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील, दिपक पवार, कृष्णा पाटील, विकास झंजाड, विजय घाटे, निलेश म्हात्रे, शैलजा पाटील यांच्यासह भाजपाचे इतर कार्यकर्ते तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन मरीना प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. वॉटर फ्रंट परिसर 1.8 कि.मी. अंतराचा असून तो परिसर 4 भागांमध्ये पसरला आहे. यात विविध प्रकारच्या गोष्टींना एकत्र करणारा वॉटर फ्रंट वॉकवे अर्थात वॉटरफ्रंट वॉकवे तयार करण्यात येणार आहे. या वॉटर फ्रंट वॉकवेमध्ये जमिनीवर चालण्यासाठी रस्ता, पाण्यावर बांधण्यात येणारा पुल, खारफुटीपाशी बनविण्यात येणारा बोर्डवे आणि सेक्टर-11 येथील प्रोमोनेड यांचा समावेश आहे.
नियोजित मरीना प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला (एमएमबी) 4 हजार चौ.मी. जागा सिडको देणार आहे. या परिसरामध्ये पर्यवेक्षक कार्यालय, फ्युएल पंपींग स्टेशन, लोडींग-अनलोडींग यासारख्या आधारभूत सुविधा विकसीत करण्यात येतील. त्याचप्रमाणे अंदाजे 25 बोटींसाठी तंरगते तराफे बनविण्यात येणार असून भविष्यात बोटींच्या संख्येनुसार मरीनाची लांबीदेखील वाढविण्यात येईल. अंदाजे 6300 चौ.मी. परिसरात उद्यान विकसीत करण्यात येऊन त्यात 40 व्यक्ती सामावू शकतील अशा आकारमानाची योगा शेड, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, स्वच्छतागृह, गझेबो आणि इतर सुविधा विकसीत करण्यात येतील. वॉटर रिक्रिएशन अंतर्गत पाण्याचा कलात्मक दृष्टीने वापर करुन विविध प्रकारच्या गोष्टी साकारण्यात येणार आहेत.
9800 चौ.मी. एवढ्या विस्तीर्ण परिसरात फुड प्लाझा, 60 व्यक्ती सामावू शकतील असे अॅम्पीथिएटर, मैदान, मैदानाच्या सभोवताली स्केटींग रिंक बनविण्यात येणार आहे. हेलीपॅड, रो-रो सर्व्हिस, प्रवासी वाहतुकीसाठी स्पीड बोट आदि बाबींचा देखील यात समावेश राहिल. त्यामुळे मरीना प्रकल्प नवी मुंबईचे एक लँडमार्क म्हणून ओळखले जाईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी यावेळी दिली.