नवी दिल्ली – हिट अँड रन प्रकरणात शिक्षा झालेल्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा जामीन रद्द करावा या मागणीसाठी दाखल झालेली याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका पिडीताने ही याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती एच.एल.दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने सलमानला जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून शिक्षा सुनावली त्या दिवसापासून मुंबई उच्च न्यायालयाने सलमानला जामीन दिला आहे. २००२ सालच्या हिट अँड रन प्रकरणात ६ मे २०१५ रोजी सत्र न्यायालयात सलमान दोषी ठरला.
न्यायालयाने त्याला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री बांद्रयामध्ये पदपथावर झोपलेल्या पाच जणांना सलमानच्या गाडीने चिरडले होते. यात एक जण ठार झाला तर, चार जण जखमी झाले होते.