नवी दिल्ली : सीमेवर सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढत आहेत.
पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत या पाश्वर्र्भूमीवर लष्कराने छोटया युध्दासाठी तयार रहाण्याची गरज आहे असे मत लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंगळवारी व्यक्त केले.
१९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युध्दासंदर्भातील एका चर्चासत्रात ते बोलत होते. भविष्यातील लढाया लहान, जलदगतीने कारवाईच्या असतील याची आपल्या कल्पना आहे. त्यासाठी नेहमीच आपली उच्चस्तरीय तयारी असली पाहिजे. आपल्या युध्दनितीमध्ये अशा प्रकारची तयारी आज महत्वाची आहे असे सुहाग म्हणाले.
पाकिस्तानकडून वाढलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनांच्या घटनांमुळे भारतीय लष्कर अधिक सजग, सतर्क झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला जे धोके, आव्हाने आहेत ती अधिक कठिण झाली आहेत. भारतीय लष्करानेही अशा संकटांचा सामना करण्यासाठी मागच्या काहीवर्षात आपली क्षमता वाढवली आहे.
शस्त्रसंधी उल्लंघन, घुसखोरी या घटनांमुळे पश्चिमीसीमेवर नेहमीच सर्तकता, सक्रीयता असते. जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी नवनवीन पध्दती अवलंबल्या जात आहेत. मागच्या काही घटनांमधून हिंसाचार अन्य भागांमध्ये वाढल्याचे स्पष्ट होते असे सुहाग म्हणाले. या कार्यक्रमात त्यांनी १९६५ च्या युध्दातील शहीदांना आदरांजली वाहिली.