पुणे : नारायणगाव जवळील नंबरवाडी येथील एका शेतकर्याच्या दारात दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) नऊच्या सुमारास ही घटना घडली. शेतकर्याच्या दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. दुचाकी सुरु करत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या ठिकाणी जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर सापडले असल्यामुळे नारायणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवीदास बबन काळे (रा. नंबरवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांनी सोमवारी रात्री आपली दुचाकी घरासमोर लावली होती. अज्ञात व्यक्तीने दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. आज सकाळी काळे नऊच्या सुमारास कामावर जाण्यास निघाले होते. त्यावेळी दुचाकी सुरु करण्यास गेले असता गाडी सुरु करताना जिलेटीन कांड्या व डिटोनेटरचा स्फोट झाला. या घटनेत काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नारायणगावचे पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा करीत असताना त्यांना जिलेंटीन कांड्या व डिटोनेटर सापडले आहेत. त्यामुळे हा स्फोट घातपात करण्यासाठी केला असल्याचे उघडकीस आले आहे. हा स्फोट पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा आंदाज पोलिसांनी वर्तविला.