मुंबई : सरकारच्या जाचक अटींमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय वरळीतील संकल्प प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आला आहे. संकल्प प्रतिष्ठानचे आयोजक सचिन अहिर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
दहीहंडी रद्द करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. जितेंद्र आव्हाडांच्या भुमिकेचे मी स्वागत करतो. मात्र दुष्काळ आणि दहीहंडी यांचा संबंध लावता येत नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. आम्ही कायम स्वरुपी उत्सव बंद करत नाही. सरकारने जाचक अटी काढल्या तर आम्ही पुन्हा उत्सव साजरा करण्यास पुढे येऊ, असे ते म्हणाले.
लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करत उंच दहीहंडी फोडण्यासाठी दरवर्षी दहिकाला उत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि न्यायालयाच्या जाचक अटींमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय यापूर्वी, ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे. तसेच कॉंग्रेसचे रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहिहंडी आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानचा दहिकाला उत्सवही यावर्षी याच कारणासाठी रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील नावाजलेली गोविंदा पथके थरांचा विक्रम रचून मोठ्या रक्कमेची पारितोषिके पटकावण्यासाठी महिनाभर कसून सराव करतात. त्यामुळे मुंबईतील गोविंदा पथकांनी या निर्णयावर टीका केली आहे.
तर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या एक दिवसाच्या उत्सवासाठी खर्च होणारे लाखो रुपये दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी केली जात आहे.