कोलंबो : तब्बल २२ वर्षांनी भारताने श्रीलंकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक मालिका विजय साकारला. अमित मिश्राने नुआन प्रदीपला शून्यावर पायचीत पकडून भारताची श्रीलंकेतील मालिका विजयाची दीर्घ प्रतिक्षा संपवली.
तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. १९९३ साली भारताने शेवटची मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत १-० कसोटी मालिका जिंकली होती.
या विजयाचे वैशिष्टय म्हणजे भारताच्या युवा संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय साकारला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी ३८६ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव २६८ धावात आटोपला आणि भारताने ११७ धावांनी मालिका विजय साकारला.
परेरा (७०) धावांवर बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. शानदार शतक झळकवणार्या कर्णधार ऍजलो मॅथ्यूजला (११०) धावांवर इशांत शर्माने पायचीत पकडले. त्यानंतर रंगना हेरथला (११) धावांवर अश्विनने पायचीत केले. त्यानंतर धम्मिका प्रसाद सहा धावांवर बाद झाला.
भारतीय गोलंदाजांना त्रस्त करुन सोडणारी ऍजलो मॅथ्यूज आणि परेराची जोडी अखेर फुटली आहे. रविचंद्रन अश्विनने परेराला रोहित शर्माकडे झेल द्यायला लावून ही जोडी फोडली. परेराने (७०) धावा केल्या.
कर्णधार ऍजलो मॅथ्यूज अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. त्याने शानदार शतक झळकवले असून, नाबाद शतकी खेळीत त्याने तेरा चौकार लगावले. मॅथ्यूज-परेरा जोडीने सहाव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली.
सिल्वा बाद झाल्यानंतर मॅथ्यूजला साथ द्यायला आलेला थिरीमाने (१२) धावांवर बाद झाला. त्याला अश्विनने लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. श्रीलंकेने १३० धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
मंगळवारी सकाळी पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कौशला सिल्वाच्या रुपाने श्रीलंकेचा चौथा गडी बाद झाला. कालच्या धावसंख्येमध्ये फक्त तीन धावांची भर घालून (२७) धावांवर उमेश यादवने त्याला बाद केले.
भारत हळूहळू विजयाच्या समीप जात चालला असून, २२ वर्षानंतर श्रीलंकेत मालिका विजय भारताच्या दृष्टीक्षेपात आला आहे. सोमवारी भारताचा दुसरा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावातील १११ धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३८६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.
दुसर्या डावात श्रीलंकेचा संघ फलंदाजीला उतरल्यानंतर उमेश यादव आणि इशांत शर्माने भेदक गोलंदाजी करत प्रारंभीच त्यांना तीन धक्के दिले. श्रीलंकेसमोर भारताला कसोटीसह मालिका विजयापासून रोखण्याचे कठिण आव्हान आहे.