ठाणे : महाराष्ट्रातील ठाण्याच्या २६ वर्षीय तरुणीने बंगळुरुमध्ये १३ व्या मजल्यावरुन उडी मारुन रविवारी आत्महत्या केली. तिचे नाव इशा हांडा होते. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येआधी तरुणीने टॅक्सी करुन बंगळुरुमध्ये सर्वात उंच इमारत कोणती याचा शोध घेतला होता. त्यासोबतच ‘आत्महत्या कशी करावी?’ असे गूगलवर ८९ वेळा सर्च केले होते. इशा व्यवसायाने फॅशन डिझायनर आणि वेलनेस कन्सल्टंट होती.
२६ वर्षीय इशाने रविवारी बंगळुरुमधील १३ मजली इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याआधी ४८ तासांपूर्वी तिने ८९ वेबसाईट्सवर ‘आत्महत्या कशी करावी?’ असे सर्च केले असल्याचे फोन रेकॉर्डवरुन स्पष्ट झाले आहे.
इशाला बालपणापासून नाटक आणि अभिनयाची आवड होती. ठाण्यातील काही अभिनय कार्यशाळांमध्येही चौथी-पाचवीत असतानापासून सहभागी होत होती. इशा हांडाने बारावीपर्यंतच शिक्षण ठाण्यात पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. तिने आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, आत्महत्येपूर्वी इशाने गूगलवर ‘हाऊ टू कमिट सुसाईड?’ अनेकवेळा सर्च केले असल्याचे कळाले, असे पोलिसांनी सांगितले
इशाने रविवारी टॅक्सी भाड्याने घेतली आणि तिला आवश्यक असलेल्या उंच इमारतींचा शोध घेऊ लागली. अखेर तिला हरालूर रोडवरील ’शोभा क्लासिक’ ही इमारत सापडली. त्यानंतर ४ वाजता ती जुना विमानतळ रोडवरील तिच्या घरी परतली. तिने तिच्या मित्र-मैत्रिणींना मॅसेज करुन सांगितले की, खासगी कामानिमित्त मी बाहेर जात आहे आणि परतण्यासाठी काही वेळ लागेल. एका तासानंतर ती ‘शोभा क्लासिक’मध्ये पोहोचली आणि टेरेसवर साडेतीन तास थांबली आणि रात्री साडे आठ वाजता तिने इमारतीवरुन उडी मारली. तिचा जागीच मृत्यू झाला.
इशाच्या बॅगमध्ये २५० ग्रॅम मेरुआना आणि काही व्हाईट पिल्स सापडल्या. त्यामुळे ती ड्रग्ज घेत असावी आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोस्टमॉर्टमनंतर तिने ड्रग्जचे सेवन केले होते की नाही, हे स्पष्ट होईल.