अनंतकुमार गवई
नवी मुंबई ः संजय भाटिया यांच्यावर दशरथ भगत यांनी एकूण १६ प्रश्नांची सरबत्ती केली आहे. या प्रश्नांची लेखी उत्तरे सिडको प्रशासनाने १७ सप्टेंबर २०१५ पर्यंत जनतेला दिली नाहीत तर सिडको विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दशरथ भगत यांनी दिला आहे.
सिडकोवर अवलंबून असलेल्या विविध हक्काच्या लाभार्थ्यांपैकी किती लाभार्थी दिले?, याची आकडेवारी लेखी स्वरुपात देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ भगत यांनी ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस’ने उपस्थित केलेल्या १६ प्रश्नांबाबत ‘सिडको’ने श्वेतपत्रिका काढावी,
अशी मागणी दशरथ भगत यांनी वाशीमधील कॉंग्रेस भवनमध्ये शुक्रवार , दि. ४ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेला २० हजार घरे नियमित करण्याचा राज्य शासनाचा जीआर एका महिन्यात आणून दाखवतो, अशी घोषणा भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली होती. मात्र, त्यांची घोषणा अद्याप घोषणाच राहिली आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार फक्त घोषणाबाज सरकार आहे. घोषणा काय करता प्रत्यक्ष करुन दाखवा, असा टोलाही यावेळी दशरथ भगत यांनी लगावला.
सिडकोकडून नवी मुंबईतील पत्रकारांसाठी सिडको गृहप्रकल्पातील ५ टक्के घरे आरक्षित ठेवण्यात येत आहेत. त्याऐवजी ‘सिडको’ने नवी मुंबईतील पत्रकारांसाठी घरांच्या किंमतीत १० टक्के सवलत द्यावी, अशी मागणीही दशरथ भगत यांनी केली आहे.
‘सिडको’ने १९७० सालापासून ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकर्यांची ३४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ जमीन केवळ ५० कोटी रुपयांमध्ये कवडीमोल दराने संपादित करुन नवी मुंबई शहर वसविले आहे. मग, नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यासाठी संघर्ष करण्यास सिडको प्रशासन का भाग पाडत आहे?, असा सवालही दशरथ भगत यांनी उपस्थित केला आहे. नवी मुंबई परिसरात घरे बांधणीच्या मुळ उद्दिष्ठांपासून सिडको आता दूर गेली आहे. सिडको आपली प्रकल्पग्रस्तांबाबतची भूमिका वेळोवेळी बदलत आहे, असेही भगत म्हणाले.
यावेळी ‘नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस’चे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते दिपक दगडू पाटील, उपाध्यक्ष सुरेश नायडू, सरचिटणीस प्रकाश थळी, राजीव मिश्रा, चंद्रकांत जाधव, विठ्ठलराव यादव, सुधीर पवार, बाळकृष्ण बैले, रोजगार विभाग अध्यक्ष रविंद्र सावंत, युवक कॉंग्रेस सचिव शैलेश घाग आदी मान्यवर उपस्थित होते.