कोल्हापूर : शहराच्या दोन्ही बाजूंना असणार्या औद्योगिक वसाहतींमध्ये सध्या मंदीचे प्रचंड वारे वाहत आहे. येथील अनेक कारखान्यांमध्ये एकाच शिफ्टमध्ये काम सुरू आहे. त्यामुळे कामगारांना सलग सुट्या देऊन कॉस्ट कटिंग करण्याकडे उद्योगपतींचा कल आहे. गणेशोत्सवाला जोडून काही दिवस कारखाने बंद ठेवण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे. त्यामुळे कामगार वर्गातही अस्वस्थता पसरली आहे.
जानेवारी महिन्यापासून देश व राज्यातील उद्योग क्षेत्रामध्ये जे मंदीचे वार वाहत आहे त्यात अजूनही फरक पडलेला नाही. अशातच पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीचे चटके उद्योगांनाही बसत आहेत. कोल्हापूरजवळ असणार्या कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये किर्लोस्कर, रेमंडपासून अनेक लहानमोठ्या २५० कंपन्यांचे प्रकल्प आहेत. मात्र बाजारपेठेत उत्पादनांची मागणीच कमी झाल्याने या उद्योगांकडून अतिशय सावधानतेने कामकाज केले जात आहे. मोठ्या कंपन्यांनीही एका शिफ्टमध्ये काम करणे, निम्म्या कामगारांना सलग दोन दिवस सुटी देऊन पुढच्या आठवड्यात इतरांना सुटी देणे यासारखे उपाय योजून खर्च कमी करण्यावर भर दिला आहे.
१७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. हे निमित्त साधून कामगारांना सलग आठ दहा दिवस सुटी देण्याचे नियोजन सामूहिकपणे करण्याचा प्रस्ताव काही उद्योजकांनी मांडला होता. मात्र काही कंपन्यांकडे थोडेफार काम आहे, तसेच कारखाने आठ-दहा दिवस बंद ठेवण्यापेक्षा येईल ते काम करण्यावर भर द्यावा, असे काही उद्योजकांचे म्हणणे आहे. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
कोल्हापूरची खास ओळख असलेल्या फाउंड्री उद्योगावरही मंदीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. येथून टाटा, महिंद्रा, अशोक लेलँड या कंपन्यांच्या वाहनांसाठीचे भाग तयार करून पाठवले जातात. गेली अनेक वर्षे या कंपन्यांच्या मोठमोठ्या ऑडर्स कोल्हापूरच्या उद्योजकांनी पूर्ण करून दिल्या आहेत. मात्र या कंपन्यांकडूनही मागणी कमी असल्याने त्या प्रमाणात फाउंड्रीचे काम कमी करावे लागत आहे. परिणामी शिरोली आणि गोकुळ शिरगाव या दोन्ही औद्योगिक वसाहतींमधील कामगार वर्गात अस्वस्थता पसरली आहे.