न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदालच्या पराभवाने धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. कारकिर्दीत प्रथमच नदालला पहिले दोन सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर पराभव स्वीकारावा लागला.
इटलीच्या ३२ व्या सीडेड फॅबियो फॉगनिनीने कडवी झुंज देत पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवला. पहिले दोन सेट नदालने ३-६, ४-६ असे सहज जिंकले होते मात्र फॉगनिनीने नंतरचे तिन्ही सेट ६-४, ६-३, ६-४ असे जिंकत धक्कादायक विजयाची नोंद केली.
तिस-या सेटमध्येही नदाल ३-१ असा आघाडीवर होता मात्र त्यानंतर फॉगनिनीने झुंजार खेळ करत सामन्याची स्थितीच पालटून टाकली. २००४ नंतर पहिल्यांदाच नदालला मोसमातील एकही जेतेपद जिंकता आलेले नाही.
स्पर्धेत आठवे सीडींग मिळालेल्या नदालचे ऑस्ट्रेलियन, फ्रेच ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्वफेरीत तर, विम्बलडनमध्ये दुसर्या फेरीत आव्हान संपुष्टात आले होते. लाल मातीचा राजा अशी ओळख बनून गेलेल्या नदालला यंदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पराभूत केले होते. कारकिर्दीत १४ ग्रॅडस्लॅम जेतेपदे मिळवणारा नदाल सातत्याने अपयशी ठरतोय.