मुंबई – गोविंदांनी उंचच उंच थर लावून बोल बजरंग बली की जय.. गोविंदा रे गोपाळा.. या तालावर बेधुंद होत उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जात आहे. दहीहंडीनिमित्त राज्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत हंडी फोडतांना सुमारे 61 गोविंदा जखमी झाले.
दादर, वरळी, घाटकोपर, दहिसर, अंधेरी, बोरिवली, ठाणे येथे हंडया फोडण्यासाठी येत असलेल्या गोविंदांमुळे शहरातील रस्ते गर्दीने फुलले आहेत. हा उत्साह दुपारनंतर शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
घाटकोपरमध्ये दहीहंडी आधी ढोल-लेझिम पथकांनीही सादरीकरण केले. तर दादरमधली आयडीयलची दहीहंडी जय हनुमान गोविंदा पथकाने सलामी दिली तर साई दत्त मित्र मंडळाच्या महिला पथकाने ही हंडी फोडली आहे.
मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी थर लावताना पडून अनेक गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम, सायन, शताब्दी, सेंट जॉज, नायर, राजावाडी व अन्य खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.