पिंपरी : पिंपरी भाजी मंडईतून ४०० किलो कांदे चोरणार्या तिघांना पिंपरी पोलिसांनी रविवारी अटक केली. या तिघांनी शुक्रवारी पहाटे कांदे चोरले होते. तसेच हा प्रकार उघडकीस येताच व्यापार्यांना धमकावले होते. सचिन शिवाजी शिंदे, मोहन गायकवाड, अजय त्र्यंबक कळाळे असे अटक करण्यात आलेल्या कांदे चोरांची नावे आहेत.
पिंपरी येथील भाजी मंडईतील एका भाजी विक्रेत्याचे सात पोत्यातील सुमारे ४०० किलो कांदे चोरट्यांनी लांबवले होते. कांदे चोरत असताना हा प्रकार परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे चोरट्यांनी चोरीनंतर सकाळी पुन्हा त्या ठिकाणी जावून व्यापार्यांना धमकावले होते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक सैफन मुजावर यांनी दिली.
या प्रकारानंतर पसार झालेल्या चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, मंडई परिसरात वाढती गुन्हेगारी आणि चोरीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. मंडईमध्ये या प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे विक्रेत्यांच म्हणणे होते. तसेच चोरीचे प्रकार थांबले नाहीत, तर बंदचा इशारा दिला होता. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपासचक्रे फिरवत रविवारी तिघांना कांदे चोरांना जेरबंद केले.