पुणे : भोसरी एमआयडीसी परिसरातील मयूर इंडस्ट्रीज या कंपनीला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.
या कंपनीत वाहनांचे सीटकव्हर तयार होतात. त्यामुळे सीटकव्हरच्या कपड्याने पेट घेतल्याने आगीने त्वरीत रौद्ररूप धारण केले. यात संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भोसरी एमआयडीसी येथील सेक्टर ७ मध्ये असलेल्या मयूर इंडस्ट्रीज या कंपनीला बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे सात बंब दाखल झाले होते. रात्रभर आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले. मात्र रौद्ररूप धारण केलेल्या आगीत कारखाना जळून खाक झाला. अद्यापही अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी असून आग विजवण्याने प्रयत्न सुरु आहेत.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून यातील नुकसान अद्याप समजू शकले नाही.