नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून देशाचे राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल ९ सप्टेंबर रोजी महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या उल्लेखनीय यशस्वी कामगिरीचा गौरव करीत ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, उपमहापौर अविनाश
लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.
१ नोव्हेंबर २०१३ पासून महापालिकेच्या शिक्षण विभागात क्रीडा अधिकारी म्हणून रुजू झालेल्या अभिलाषा म्हात्रे यांचा सन २०१२ च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तसेच सन २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने जी सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली होती त्यामध्ये
रेडर म्हणून महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता. त्यांना लाभलेला पुरस्कार संपूर्ण नवी मुंबईकरांचा सन्मान आहे, अशी भावना व्यक्त करीत महापौरांसह मान्यवर पदाधिकारी आणि नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.
सभागृह नेते जयवंत सुतार यांनी मांडलेल्या तसेच विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी अनुमोदन दिलेल्या अभिनंदन ठरावानुसार अभिलाषा म्हात्रे यांच्यासमवेत लॉस एंजल्स, ऑस्ट्रेलिया येथे संपन्न झालेल्या एशिया पॅसिफिक स्पेशल ऑलिम्पिक जागतिम समर गेम्स जलतरण स्पर्धेत बॅक स्ट्रोक क्रीडा
प्रकारात सुवर्णपदक संपादन करणारी क्रीडापटू स्नेहा शैलेंद्र वर्मा तसेच बे्रस्ट स्ट्रोक क्रीडा प्रकारात रौप्यपदक संपादन करणारी क्रीडापटू दिशा धिरज मारु यांनाही सन्मानित करण्यात आले. स्वतःच्या शारीरिक कमतरतेवर मात करीत या विशेष विद्यार्थ्यांनी मिळविलेले सदरचे यश इतर मुलांसाठी प्रेरणादायी
असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळा क्र. ४, सीबीडी-बेलापूर येथील विद्यार्थीनी तथा नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू अनिला बाबू
राठोड हिने २९ व्या कॅडेट सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत तायक्वॉंडो क्रीडा प्रकारात ११ ते १४ कॅडेट वयोगटाच्या ४१ किलो वजनी गटात सुवर्णपदक संपादन केले असून तेलंगणा, हैद्राबादयेथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत
राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. या यशाबद्दल अनिला हिचा महासभेत सन्मान करण्यात आला. यावेळी क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक सुभाष पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.
त्यासोबतच केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांच्या दुर्देवी
निधनानंतर त्या प्रकरणातील तत्कालीन आरोपी सोहनलाल यांचा शोध घेऊन शोधपत्रकारितेत नवी मुंबईकर असलेले दै. सकाळचे मुंबई प्रतिनिधी ज्ञानेश चव्हाण यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. दरम्यान, नवी मुंबईतील नागरिकांकडून मला मिळणार्या प्रेमाचे ऋण मोठे असून माजी मंत्री गणेश नाईक यांनी तसेच सर्वच लोकप्रतिनिधींनी दिलेले प्रोत्साहन याचा माझ्या यशात मोठा भाग आहे. माझ्या पुढील वाटचालीसाठी सत्कारातून दिलेल्या शुभेच्छा कायम प्रोत्साहन देतील, अशी भावना याप्रसंगी बोलताना अभिलाषा म्हात्रे यांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि महापालिका अधिकारीकर्मचारी
यांच्याकडून मिळणारे सहकार्य आणि सदिच्छांचाही म्हात्रे यांनी उल्लेख केला.