नवी मुंबईः जागतिक साक्षरता दिनानिमित्त राबाडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील हिंदी माध्यमाच्या विद्यार्थीनींनी पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया नामक नाटक सादर केले. तर मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी मुलगी शिकली प्रगती झाली नाटकातून मुलींनाही मुलांप्रमाणेच शिक्षण द्या, असा संदेश दिला.
साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्व पटवून सांगितले. शिक्षक कैलास दाते यांनी मला शाळेत जायला पाहिजे, बग बग मुले कशी शाळेला चालली या सारखी साक्षरता प्रबोधन पर गीते सादर करून मुलांना खिळवून ठेवले. तसेच दिलीप निंबारा यांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आज सदर कितीतरी मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दूर असल्याचे विदारक चित्र मुलांसमोर
आर्ततापूर्ण रितीने प्रस्तुत केले. यावेळी चर्चगेट येथील शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण देवून साक्षरता हेच जीवन आहे आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे संदेश अत्यंत सुंदर रितीने नाटकाच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आले.
दरम्यान, शिक्षणाच्या प्रवाहातून दूर असलेल्या तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाज प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः उत्तम शिक्षण घेवून आपल्या परिसरातील निरक्षरांना साक्षर करण्याचा वसा घेतल्यास १०० टक्के साक्षर भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नसल्याचे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मारूती गवळी यांनी सांगितले.