नवी मुंबई : प्रभागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तात्काळ ई-टॉयलेटची उभारणी करावी अन्यथा आपणास जनआंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी महापालिका आयुक्तांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
या प्रभागात १९९८ सालापासून नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु आजतागायत महापालिका प्रशासनाने या प्रभागात स्वच्छतागृहाची उभारणी केलेली नाही. प्रभागातील लोकांची स्वच्छतागृहाअभावी अनेक वर्षे गैरसोय होत आहे. एकीकडे महानगपालिकेने सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था केलेली नाही आणि दुसरीकडे पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबई शहराचा दर्जा व नियोजन लक्षात घेता ही बाब अंत्यत लज्जास्पद असल्याचे नगरसेवक विशाल डोळस यांनी निवेदनात म्हटले आहे.