अहमदाबाद : गुजरातच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन बोटींवर पाकिस्तानी नौदलाने केलेल्या गोळीबारात एक भारतीय मच्छीमार ठार झाला. शुक्रवारी ही घटना घडली.
कुठल्या कारणामुळे पाकिस्तानी नौदलाकडून अशी कारवाई करण्यात आली तसेच भारतीय मासेमारी नौकांनी पाकिस्तानच्या समुद्र सीमेमध्ये प्रवेश केला होता का ? ते अजून स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाची नौका लगेचच मध्य समुद्रात घटनास्थळी गेली. इक्बाल भट्टी असे मृत मच्छीमाराचे नाव असून, त्याच्यासोबत आणखी एक मच्छीमार बोटीमध्ये होता.
गुजरातला १६०० कि.मी.चा सागरी किनारा असून, ही सीमा पाकिस्तानला जाऊन मिळते. भारत आणि पाकिस्तानच्या नौदलांनी यापूर्वी अनेकवेळा सागरी सीमांचे उल्लंघन केले म्हणून परस्परांच्या मच्छीमारांना अटक केली आहे. पण गोळीबाराची घटना दुर्मिळ आहे. अलीकडच्या काळात श्रीलंकन नौदलाने तामिळनाडूतील मच्छीमारांवर अशा प्रकारचे हल्ले केले आहेत.