अहमदाबाद : पाटीदार पटेल आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलला ताब्यात घेतल्यानंतर गुजरात सरकारने संपूर्ण राज्यातील मोबाईलमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.
कायदा-सुव्यवस्था बिघडू नये तसेच अफवा रोखण्यासाठी आम्ही मोबाईलमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे असे गुजरातचे पोलिस महासंचालक पी.सी.ठाकूर यांनी सांगितले.
गुजरात पोलिसांनी शनिवारी सकाळी एकता यात्रा काढण्याच्या तयारीत असलेल्या हार्दिक आणि त्याच्या 35 सहकार्यांना सूरतच्या वारच्छा भागातून ताब्यात घेतले.
मागच्या महिन्यात 25 ऑगस्टला हार्दिक पटेलच्या अटकेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावेळी गुजरात सरकारने आठवडाभर मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत केली होती. गुजरात सरकारचा हा निर्णय मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयाने योग्य ठरवला होता.