अनंतकुमार गवई
वाशी ः नवी मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करणारे तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळ यंदा 45 व्या वर्षात पदार्पण करीत असून, यावर्षी शिवछाया मित्र मंडळने आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रतिबिंब देखावा सादर केला आहे. नवसाला पावणारा नवी मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या या गणरायाच्या दर्शनाचा गेल्या वर्षी सुमारे 15 लाख भाविकांनी लाभ घेतला होता. त्यामध्ये नवस फेडणार्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे.
भाविकांचा वाढता ओघ पाहून यंदा शिवछाया मित्र मंडळतर्फे दर्शनासाठी आणि नवस फेडणार्या भाविकांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई शहराचा उगम होण्यापूर्वी 1971 मध्ये कै. बबनशेठ पाटील यांनी तुर्भे नाका येथे सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन या सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली.
आजपर्यंत कोणताही खंड न पडता शिवछाया मित्र मंडळचा गणेश उत्सव सुरु आहे. मंडळाने यापूर्वी 45 वर्षांत अनेक देखावे सादर केले आहेत. त्यामध्ये महालक्ष्मी मंदीर, भीमा शंकर मंदीर, मोरगावचे मयुरेश्वर मंदीर, शिर्डी येथील साईबाबा मंदीर, उत्तराखंडमधील केदारनाथ मंदीर तसेच स्त्रीभ्रुण हत्या, स्त्री शक्ती-स्त्री मुक्ती, पर्यावरण इत्यादींचा समावेश आहे. या सर्व देखाव्यांना अनेक गणेश दर्शन स्पर्धांमध्ये गौरविण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा विघ्नहर्ता पुरस्कार, स्वच्छता पुरस्कार, शिस्तबद्ध मंडळ पुरस्कार आदी पुरस्कार मंडळाला मिळाले आहेत. टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्ता या वृत्तपत्र समुहानीही मंडळाला विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.
दरवर्षी प्रमाणे शिवछाया मित्र मंडळचा गणेश उत्सव तुर्भे सेक्टर-20 मधील एसटी बस आगाराच्या भव्य मैदानावर साजरा होत आहे. या गणरायाची प्रतिष्ठापना मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर नाईक उपस्थित होते. यंदाच्या उत्सव काळात मंडळातर्फे आरोग्य शिबीर, नेत्र चिकीत्सा शिबीर, गरजु महिलांना साडी वाटप आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज सायंकाळी मंडपामध्ये भजन आणि हरिपाठ आदी कार्यक्रम पार पडत आहेत. दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. नवस फेडणार्या भाविकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे मंडळाने यावर्षी दर्शनासाठी येणार्या भाविकांकरीता आणि नवस फेडणार्या भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगांचे आयोजन केले आहे, असे अंकुश वैती यांनी सांगितले.
दुष्काळाच्या खाईत सापडलेला महाराष्ट्र, वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणाचा होत चाललेला र्हास आणि अस्वच्छतेमुळे फैलावणारे साथीचे रोग, याबाबत जनजागृती करण्यासाठी मंडळाने यंदा प्रतिबिंब या विषयावर देखावा सादर केला आहे. या मंदिरात भाविकांना सर्वत्र स्वतःचे प्रतिबिंब दिसणार असून, प्रत्येक प्रतिबिंबात पर्यावरणाचा स्थर ढासळल्यानंतर काय दुष्परिणाम होतात, याची जाणीव होणार आहे. प्रतिबिंब देखावा प्रसिद्ध कलादिग्दर्शक निलेश चौधरी (मीरा रोड) यांनी साकारला असून, गणरायाची सुबक मुर्ती प्रसिद्ध मुर्तीकार संतोष कांबळी (लालबाग) यांनी तयार केली आहे. तसेच संहिता लेखन अमृत पाटील नेरुळकर यांनी केले आहे. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा संकल्पही मंडळाने केला आहे, अशी माहिती अंकुश वैती यांनी दिली.