नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेतेना. गणेश नाईक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नुकताच साजरा झाला. ईतिहासामध्ये प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्व असतेच. नवी मुंबई शहराचा राजकीय आणि सामाजिक इतिहास जेव्हा तटस्थपणे लिहीला जाईल, त्यावेळी 15 सप्टेंबर या दिवसाची इतिहासालाही सुवर्णअक्षरामध्ये दखल घ्यावीच लागेल. एकाद्या शहराचे शिल्पकार ही उपाधी ठाण्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर उभ्या देशात कोणाला मिळाली नाही. ती उपाधी लोकनेते गणेश नाईकांनाच मिळाली आहे. अर्थात ती उपाधी त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम केले आहेत. चपला झिजविल्या आहेत. शरीरातील प्रत्येक श्वास हा नवी मुंबईच्या विकासाकरता समर्पित केलेला आहे. नवी मुंबईच्या प्रगतीसाठी आणि नवी मुंबईकरांच्या विकासासाठी लोकनेते गणेश नाईकांनी तनमन आणि खिशातील धनही मोठ्या प्रमाणावर समर्पित केलेले आहे. लोकनेते गणेश नाईकांना नवी मुंबईकर गेल्या तीन दशकापेक्षा अधिक काळापासून प्रेमाने, आदरपूर्वक दादा याच नावाने संबोधतात. पावणे चार दशके दादांनी फक्त आणि फक्त नवी मुंबई शहराच्याच विकासाचा विचार केलेला आहे. दादांनी व्यक्तिगत आणि कौंटूबिक सुखाला तिलांजली देत नवी मुंबई शहर हेच आपले कुटूंब समजून परिश्रम केले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहराचे शिल्पकार ही उपाधी दादांशिवाय अन्य कोणाला मिळूच शकत नाही आणि मिळणारही नाही. दादांना दूरदृष्टीचा उपजतच गुण मिळालेला आहे. दादांनी जे विचार मांडले, त्या विचारांची प्रथम थट्टा केली गेली आणि यथावकाश ते विचार अंमलात आणले गेले, दादांच्या विचारांचे महत्व समाजमनाला आणि त्या त्या काळातील राज्यकर्त्यांना पटत गेले. दादांनी जी जी लोकहिताची कृती सर्वप्रथम केली, त्या कृतीचीही टिंगलटवाळी केली गेली आणि नंतर मात्र दिल्लीमधील रथी-महारथी राजकारण्यांपासून ते गल्लीतल्या चमकेश घटकांपर्यत सर्वांनीच दादांच्या कृतीची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र राज्यावरचे कर्ज फेडण्यासाठी शासकीय जमिनींची विक्री करण्याची आणि वाढत्या लोकसंख्येला पुर्नवसनाचा पर्याय म्हणून मुंबईनजिकच्या खाडीवर भराव टाकून एका नवीन शहराची निर्मिती करण्याचा प्रस्ताव दादांनी अनेक वर्षापूर्वी मांडला होता. दादांच्या या प्रस्तावाला अनेक हिमनगांनी हास्यास्पद ठरवित शासकीय जमिनीची विक्री या पर्यायावर टीका केली होती. पण आज आपणास जे कुर्ला-बांद्रा कॉम्पलेक्स दिसत आहे, ते कशावर उभारले गेले आहे. शासकीय जमिनीची आज विक्री होत आहे. दादांच्या विचारांवर तत्कालीन राज्यकर्त्यांनी अंमलबजावणी केली असती तर राज्य शासनावरील कर्जाचा डोंगरही कमी झाला असता व शासकीय जमिनीवर आज जे अतिक्रमण झालेले पहावयास मिळत आहे. कदाचित तेही पहावयास मिळाले नसते. जनता दरबार ही दादांची संकल्पना सुरूवातीच्या काळात चेष्टेचा विषय ठरली होती. पण दादा आपल्या संकल्पनेवर ठाम राहीले, त्यांनी आपली संकल्पना प्रत्यक्षात कृतीत उतरविली. पालकमंत्र्यांचा जनतेशी थेट संपर्क होवू लागला. प्रशासन दरबारी प्रलंबित कामे त्वरीत होवू लागली. आज दादांच्या जनता दरबार या संकल्पनेचे अनुकरण दिल्लीपासून गल्लीतल्या नेत्यांपर्यत करू लागले आहेत. दादा, तुमच्या भुतकाळाबाबत बोलावे तितके कमी आहे, सांगावे तितके कमी आहे आणि लिहावे तितके कमी आहे. पण दादा तुमचा भूतकाळ सुवर्णाक्षरामध्ये लिहीण्यासारखा असला तरी दादा वर्तमानात आपल्या नवी मुंबई शहरात काय सुरू आहे याबाबत आपणाशी सुंसंवाद साधणे गरजेचे असल्यानेे अग्रलेखाच्या माध्यमाचा आम्हाला स्वीकार करावा लागत आहे. दादा, आज शहरामध्ये काय घडत आहे, काय चालत आहे याबाबत आपला काही संबंध नसला तरी दादा आपण केवळ राज्यकर्ते नाही आहात, तर या नवी मुंबई शहराचे पालक आहात. या शहराचे अलिखित स्वरूपात आपण पालकत्व स्वीकारलेले आहे. आपल्या हयातीपर्यत हे पालकत्व अन्य कोणाकडे जाणे शक्यच नाही. ज्या घराची मुले वाममार्गाला जातात, ज्या घरात चुकीचे प्रकार घडतात, त्या प्रकाराबाबत समाजामध्ये सर्वप्रथम घरच्या पालकांनाच दोषी ठरविले जाते. पालकांचे संस्कार तकलादू ठरल्याचा आरोपही जगजाहीरपणे होत असतो. त्यामुळे वर्तमानात नवी मुंबई शहरामध्ये होत असलेला चुकीचा पायंडा आपल्या निदर्शनास आणून देवून भविष्यात कोणी आपणावर शहराच्या परिस्थितीविषयी दोषारोप करू नये म्हणून आपणास सावध करण्याचा हा छोटेखानी प्रयास आम्ही करत आहोत. दादा, नवी मुंबई महानगरपालिकेत तुमची सत्ता आहे. नवी मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना नाही तर लोकनेते गणेश नाईकांच्या विचारांना, ध्येयधोरणांना मतदान केलेले आहे. नवी मुंबईकरांचा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर श्रध्दा आहे, तुमच्यावर प्रेम आहे. मोदी लाटेचा अपवाद वगळता नवी मुंबईकरांच्या हद्यीच्या सिंहासनावर तुम्हीच विराजमान आहे याचा संदेश महापालिका निवडणूक निकालातून उभ्या महाराष्ट्राला प्राप्त झालेला आहे. दादा, शहराचे शिल्पकार तुम्हीच असल्याचे या शहराच्या यशाचे सर्व श्रेय तुम्हालाच जाते आणि अपयशाचे खापरही तुमच्यावरच फुटणार. दादा सर्व स्तुतीभाटांचा गराडा आज तुमच्यासभोवताली आहे. सत्य सांगण्याचे धाडस कोणी सांगणार नाही. आम्ही कटू भाषेत बोलत आहोत म्हणून राग मानू नका. दादा, शहर स्वच्छतेचा तुम्ही सातत्याने आग्रह धरला आहे. तुमच्याच मार्गदर्शनामुळे, ध्येयधोरणामुळे या शहराला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात सलग दोन वेळा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळालेला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्रशासन पातळीवर महापालिकेवर सातत्याने बक्षिसांचा वर्षाव होत आहे. हे पुरस्कार मिळतात, कंत्राटी कामगारांच्या विशेषत: सफाई कामगारांच्या परिश्रमामुळेच. पण दादा आता रस्त्यावर उतराच! सत्य परिस्थिती जाणून घ्या. एक महाभयावहपणा आपल्या निदर्शनास येईल. सफाई कामगारांच्या प्रकरणातील फार मोठा बोफोर्स घोटाळा आपल्याला दिसून येईल. महापालिका प्रशासनाकडे ठेकेदारांकडून देण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या यादीपैकी किमान 60 ते 65 टक्के कामगारही सफाईचे काम करताना आपल्या निदर्शनास येणार नाही. 35 ते 40 टक्केपेक्षा अधिक कामगार हे रस्त्यावर सफाई करण्यास उतरतही नसल्याचे निदर्शनास येईल. काही कामगार ठेकेदारांच्या मर्जीनुसार वापरले जातात. काही कामगार केवळ कागदोपत्रीच आहे. काही ठेकेदारांकडे राजकारण्यांच्या नातलगांची नावे सफाई कामगारांच्या यादीत आहेत, जे आजवर कधी रस्त्यावर सफाई करतानाही दिसले नाहीत. अलिकडच्या काळात सफाई कामगारांचा राजकारणात शिरकाव झाला असून त्यांची राजकारण्यांशी वाढती सलगी त्यांच्या कंत्राटदारांसाठी मुस्कटदाबी ठरू लागली आहे. अनेक कंत्राटी कामगारांना सर्वच राजकीय पक्षात मानाची पदे मिळू लागली आहे. त्यामुळे सफाईचे काम न करता या कंत्राटी कामगारांना घरबसल्या वेतन मिळू लागले आहे. नवी मुंबईकर हा प्रकार जवळून पाहत आहे. कोणाला दोष द्यावा तेच समजत नाही. या प्रकारापासून तुम्हीच नक्कीच अनभिज्ञ असला तरी कोपरखैराणे, तूर्भे, नेरूळ, वाशी भागावर नजर टाका. या कंत्राटी कामगारांना अन्य पक्षांप्रमाणे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही पॅरेट्सच्या वॉर्ड अध्यक्षपदापासून विद्यार्थी सेलपर्यत सर्वोच्च पदे बहाल करण्यात आली आहेत. दादांची माणसे असे कुंकू राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदांमुळे त्यांच्या कपाळी लागल्याने कंत्राटदार तरी त्यांना सफाईचे काम करायला कसे सांगणार? काम न करता ठराविक कंत्राटी कामगारांनी वेतन लाटण्याचा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. पण यात बदल कधी होणार? दादा, नवी मुंबईकर मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहत आहेत. दादा, आता भाकर करपू लागली आहे. पलटी न मारल्यास भाकरीचा कोळसा होणार आहे आणि आपणास माहिती नसलेल्या या प्रकारामुळे नाहक आपणास लोकक्षोभाचा सामना करावा लागणार आहे. दादा, आपण या प्रकरणाची झाडाझडती घेवून प्रामाणिकपणे काम करणार्या कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा आणि वेतन घेवून काम न करणार्या कंत्राटी कामगारांचा शोध घ्यावा. दादा, नवी मुंबईकरांना आता तुम्हाला पुन्हा एकवार रामशास्त्री प्रभूणेंच्या रूपात पहावयाचे आहे. काम न करता वेतन घेणे हा खर्या अर्थांने राजद्रोहच मानावा लागेल. अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसची पदे मिळतातच कशी, त्यांचे गॉडफादर कोण याची दादा आता तुम्हालाच छाननी करावी लागेल. दादा, स्वच्छ व सुंदर नवी मुंबईचे स्वप्न तुम्ही सातत्याने पाहिले. या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी आजही साठी उलटल्यावरही दादा तुम्ही परिश्रमाची शिकस्त करत आहात. या शहराला लागलेला बकालपणाचा काळीमा आजही तुम्हाला व्यथित करत असल्याचे आम्ही जवळून पाहिले आहे आणि अनुभवलेही आहे. दादा, शहरात लागणार्या अनधिकृत होर्डींग प्रकाराबाबत तुम्ही खासगीत तसेच सार्वजनिक कार्यक्रमातूनही नाराजी व्यक्त केलेला आहे, वेळप्रसंगी आपला संतापही व्यक्त केेलेला आहे. नेत्यांची शिकवणीची अंमलबजावणी करणे हे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे, अनुयायाचे कर्तव्यच असते. आपल्या कृतीतून नेत्यांना अभिमान वाटावा असे कार्य कार्यकर्त्यांकडून सदोदीत होणे काळाची गरज असते. आजमितीला नवी मुंबई शहर पूर्णपणे अनधिकृत होर्डींगचा विळख्यात अडकलेले आहे. शहराला बकालपणा तर आलाच आहे, पण अनधिकृत होर्डीगमुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या महसूली उत्पन्नातही घट येवू लागली आहे. अनधिकृत होर्डीग लावणार्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला अधिकार असतानाही महापालिकेचा अतिक्रमण विभाग अशी फौजदारी गुन्हे दाखल करण्याच टाळाटाळ करत आहे. अनधिकृत होर्डीग काढण्यासही उदासिनता दाखवित आहे. सध्या नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ठणठणात आहे. महापालिका दिवाळखोरीत या विषयावर विरोधक बेंबीच्या देठापासून ओरडत नवी मुंबईकरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयास करत आहेत. होर्डीगचे क्षुल्क जमा झाले तरी लाखो रूपयांचा महसूल प्राप्त होईल. अनधिकृत होर्डीमगमध्ये 85 टक्केपेक्षा अधिक होर्डीग सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्याने कारवाई करून, होर्डीग हटवून त्यांची नाराजी कशाला ओढवून घ्यायची असा सूर महापालिका प्रशासनाकडून आळविला जात आहे. दादा, तुम्ही शिवशंकराप्रमाणे भोळे आहात. तुमच्याच सानिध्यात राहून अनेक भस्मासूर निर्माण होवू लागले आहेत. दादा, आता तरी तिसरा डोळा उघडा. नवी मुंबई शहराला वाचविण्यासाठी, प्रगतीपथावर आणण्यासाठी तुमचे तांडव होणे आता नवी मुंबईच्या हितासाठी होणे गरजेचे आहे. हे शहर तुमचे आहे. तुमच्याकडे या शहराचे पालकत्व आहे. या शहराचे शिल्पकार म्हणून तुम्हालाच संबोधले जात आहे. दादा, आता रस्त्यावर उतरा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून , पदाधिकार्यांकडून मिळालेल्या कागदोपत्री माहितीवर विसंबून न राहता जनसामान्यांकडून माहितीचे संकलन करा. कागदावर दिसणारे कंत्राटी कामगार रस्त्यावर सफाई करताना दिसलेच पाहिजे याकरता अॅक्शन प्लॅन आता कृतीत आणा. अनधिकृत होर्डीगच्या विळख्यातून या शहराला मुक्त करण्यासाठी, या शहराचा बकालपणा हटविण्यासाठी दादा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना, नगरसेवकांना खडसावून उपदेशाचे डोस पाजा. ज्या ठिकाणी यापुढे अनधिकृत होर्डीग लागतील त्या नगरसेवकांशी, पदाधिकार्यांशी, कार्यकर्त्याशी माझा संबंध नाही अशी भूमिका जाहीर केल्यास या चमकेश घटकांचे पाय नक्कीच जमिनीवर येतील. दादा, नवी मुंबईकरांना तुमच्याकडे, तुमच्या परिश्रमाकडे, तुमच्या ध्येयधोरणाकडे पाहून महापालिका निवडणूकीत मतदान केले आहे. नवी मुंबईकर जनता तुमच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. आम्ही नवी मुंबईकरांच्या भूमिकेतून आपणास साकडे घातले आहे. आपण आम्हास निराश करणार नाही. पण दादा, या चित्रामध्ये आम्हाला परिवर्तन अपेक्षित आहे.
– संदीप खांडगेपाटील