नवी दिल्ली : बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत असले तरी आयसीसीचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी त्यांचे विश्वासू आणि बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
विशेष सर्वसाधारण सभा बोलावून हंगामी अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया पार पाडली जाणार, हे जवळपास निश्चित आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी पूर्व विभागाचा दावा असल्याने अध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराला त्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. मात्र यावेळची अध्यक्षपदासाठीची निवडणूक ही फेरनिवडणूक असल्याने केवळ प्रस्तावकाची (प्रपोझर) गरज आहे.
बीसीसीआयच्या घटनेतच तशी तरतूद असल्याचे बोर्डाच्या एका पदाधिकार्याने सांगितले. शुक्ला यांच्यासह आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र पवार निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे समजते.
सध्या ते महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्यावर आहेत. दुसरीकडे, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्ला यांच्या नावाला पसंती दर्शवल्याचे समजते. बीसीसीआयच्या निर्णय प्रक्रियेत जेटली यांचा शब्द प्रमाण मानला जातो. शुक्ला यांची प्रतिमा स्वच्छ आहे. शिवाय त्यांचे सर्वाशी चांगले संबंध आहेत.
शुक्ला यांना श्रीनिवासन यांचाही पाठिबा मिळेल, असे वाटले होते. मात्र किंगमेकर श्रीनिवासन यांनी वेगळी खेळी करण्याचे ठरवले आहे. आपल्या विश्वासूंची ते गुरुवारी बंगळूरुत भेट घेणार आहेत. श्रीनिवासन हे अमिताभ चौधरींच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
दक्षिण विभागासह पूर्व विभागाकडूनही श्रीनिवासन यांच्या उमेदवाराला पाठिंबा मिळू शकतो. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूरही पूर्व विभागातील क्रिकेट असोसिएशनच्या संपर्कात राहून चाचपणी करत आहेत. मात्र त्यांचा कल शुक्ला यांच्याकडे असल्याचे समजते. श्रीनिवासन यांनी चौधरी आणि ठाकूर यांनी शुक्ला यांची पाठराखण केल्यास हंगामी अध्यक्षपदासाठी दुरंगी लढत अपेक्षित आहे.