दिपक देशमुख
नवी मुंबईः राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना नवी मुंबईकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठी मोरबे धरणात उपलब्ध आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण परिसरात चांगला पाऊस पडत असून नवी मुंबईतही मुसळधार सरी बरसत आहेत. तर मोरबे धरण क्षेत्रातही आतापर्यंत 2024.50 मि.मी इतका पाऊस पडला असून धरणाची पातळी 80 मीटर पर्यंत पोहचली आहे.
रायगड जिल्ह्यात माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाची खोली 88 मीटर एवढी आहे. आज झालेल्या नोंदणीनुसार धरणात 79.49 मीटर पेक्षा जास्त पाणी भरले असून या साठ्यामुळे नवी मुंबईकरांना ऑगस्ट 2016 पर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे नवी मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये पाणी कपात लागू केली आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडे हक्काचे मोरबे धरण असल्यामुळे नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले नाही. तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले होते.
दरम्यान, आता राज्यभरात चांगला पाऊस होत आहे. नवी मुंबईतही गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार सरी कोसळत आहेत. ऑगस्टच्या 15 तारखेपासून गायब झालेला पाऊस पुन्हा परत आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.