उरण ः भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 85 वा हुतात्मा स्मृती दिन उद्या 25 सप्टेंबर 2015 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर गावात साजरा करण्यात येणार आहे. चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन चिरनेर ग्रामपंचायत आणि रायगड जिल्हा परिषद यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास रायगड जिल्हा पालकमंत्री ना. प्रकाश मेहता, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश हरिश्चंद्र टोकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सविनय कायदेभंग आंदोलनातंर्गत 25 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहातील आंदोलनाकर्त्यांवर जुलमी ब्रिटीश पोलिसांनी निदर्यपणे बेछुट गोळीबार केला या गोळीबारात धाकू फोफेरकर, नवशा कातकरी (चिरनेर), रामा कोळी (मोठी जुई), हसुराम घरत (खोपटे), रघुनाथ न्हावी (कोप्रोली), परशुराम पाटील (पाणदिवे), आनंदा पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या (दिघोडे) आदी आठ आंदोलनकर्ते धारातिर्थी पडले. या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्यात येतो.