मुंबई: मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत गुज्जूभाई दि ग्रेट या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे.
राज्यातील मल्टिप्लेक्सनी प्राइम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवणं बंधनकारक केलेलं असतानाही, अनेक मल्टिप्लेक्समध्ये हा नियम डावलून प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येतात. बोरिवलीतील सोना थिएटरमध्येही प्राइम टाइममध्ये गुज्जूभाई दि ग्रेट या चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता आणि मराठी चित्रपटाचा एकही शो त्या स्लॉटमध्ये नव्हता. हे समजताच मनसे कार्यकर्त्यांनी त्या विरोधात निदर्शनं करत मराठी चित्रपटाना प्राइम टाइमचा स्लॉट मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली.
ही फक्त सुरूवात आहे, राज्यात जिथं-जिथं प्राइम टाईमला गुजराती आणि अन्य प्रादेशिक चित्रपट दाखवले जात असतील त्या थिएटर्स विरोधात आम्ही आंदोलन करू आणि जे थिएटरमालक आम्हाला विरोध करतीला त्यांना मनसे स्टाईल दणका दाखवू, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.