मुंबई : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असावे, यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. तसेच स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष रवी गरुड, महेंद्र साळवे, कोषाध्यक्ष शिरीष चिखलीकर, भन्ते करुणानंद थेरो, भन्ते लंकानंद थेरो, सदानंद मोहिते, सीताराम पवार या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच या कार्यक्रमास समन्वय समितीच्या प्रतिनीधींना बोलवण्यात येईल.
इंदू मिलमधील स्मारकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. इंदू मिल येथे होणार्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात समन्वय समितीच्या सदस्यांना स्थान द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असावे, यासंदर्भात समन्वय समितीने आराखडा तयार केला असून त्याचाही विचार व्हावा, तसेच कार्यक्रमापूर्वी चैत्यभूमीची रंगरंगोटी व सजावट व्हावी आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.
*** दुष्काळग्रस्तांसाठी 5 हजाराचा निधी
यावेळी विपशयना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टच्या वतीने भन्ते करुणानंद यांनी दुष्काळग्रस्तांसाठी 5 हजार रुपयांचा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना दिला. बौद्ध भिक्खू यांनी जमा केलेला निधी दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येत असल्याचे भन्ते करुणानंद यांनी यावेळी सांगितले.