मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. जागतिक बाजारातून मिळणारे चांगले संकेत आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या उत्साहामुळे शेअर बाजार ५०० अंशांनी वधारला होता. शेवटच्या काही तासात सेन्सेक्स २६८०० पातळीवर तर निफ्टी ८१३० पातळीपर्यंत पोचला. दोन्ही निर्देशांक २.२५ टक्के वधारले.
अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २६,७८५.५५ पातळीवर व्यवहार करत ५६४.६० अंशांनी वधारून बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६८.४० अंशांनी वधारून ८,११९.३० पातळीवर बंद झाला आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात देखील खरेदीचा जोर शेवटपर्यंत कायम होता. मिडकॅप २.१% वाढीसह १३,२७२ पातळीवर तर स्मॉलकॅप निर्देशांक १.६% वधारून ११,२२१.५ पातळीवर बंद झाला आहे.
आजच्या सत्रात टाटा स्टील, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बॉश आणि हिंदाल्को यांचे शेअर्स प्रत्येकी ४.५ ते ६.१% वधारून बंद झाले आहेत. तर, मारुती सुझुकी, लुपिन, डॉ रेड्डी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे शेअर सर्वाधिक घसरले होते.