नवी मुंबई : सिडकोचे नवनियुक्त सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी सोमवारी नवीन पनवेल नोडचा पाहणी दौरा करून तेथे सिडकोतर्फे प्रगतीपथावर असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यात सेक्टर 16 मध्ये सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या उद्यानाच्या विकासकामाचा देखील समावेश होता. या दौर्यानंतर त्यांनी नोडमधील विकासकामे व नागरिकांच्या समस्यांबाबत सिडको अधिकार्यांसोबत चर्चा करून आवश्यक तेथे तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या सेक्टर 3, नवीन पनवेलमधील कचरा उचलला न जाण्याच्या तक्रारीची दखल घेत चव्हाण यांनी स्वतः त्या परिसरास जातीने भेट दिली. सदर परिसरातील स्थानिक नागरिकांशी चर्चा करून तेथील कचरा तात्काळ उचलून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले. चव्हाण यांच्या निर्देशानुसार तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मे. बीव्हीजी इंडीया एजेन्सीद्वारे कचरा तात्काळ उचलला गेला. त्याचबरोबर सिडकोच्या चाळ येथील अधिकृत डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन तेथील कचर्यावर करण्यात येणार्या प्रक्रियेची चव्हाण यांनी सविस्तर माहिती घेतली.
या पाहणी दौर्यादरम्यान चव्हाण यांच्यासोबत अधीक्षक अभियंता (पनवेल) एस. एस. विसाळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एम. भानगावकर हे सिडको अधिकारी उपस्थित होते. सिडकोने नागरी सुविधांची पूर्तता करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. नागरिकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी नागरी समस्यांचा सविस्तर आढावा सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून वेळोवेळी घेतला जातो व त्यावर तात्काळ उपाययोजना केली जाते. यामुळे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांना कार्यतत्पर व कार्यक्षम प्रशासन देण्यात सिडको महामंडळ अग्रेसर राहिले आहे.