** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिघा घर बचाव संषर्ष समितीचे लेखी निवेदन**
नवी मुंबई : दिघा भागात गरजेपोटी बांधलेल्या 86 इमारती असून मानवतेच्या दृष्टीकोणातून त्या निष्काषित करु नयेत, एमआयडीसीच्या कारवाईस स्थगिती द्यावी, अशा मागणीचे लेखी निवेदन दिघा घर बचाव संघर्ष समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न होता या प्रश्नी जनहितार्थ तोडगा काढण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना करण्यात आली आहे. या प्रश्नी मी जातीने लक्ष घालून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले.
न्यायालयाच्या आदेशाने दिघा येथील इमारतींवर एमआयडीसी महामंडळाने गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या इमारतींमधून राहणार्या गरीब, गरजू आणि सर्वसामान्य गोर गरीब नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. लोकभावनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव नाईक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे विकासपर्वरूपी आमदार संदीप नाईक यांनी घर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक नविन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, नगरसेविका दिपा राजेश गवते यांंच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांची रविवार, 4 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे भेट घेतली.
दिघा येथे गरजपोटी बांधलेल्या 86 इमारती आहेत. या भागातील रहिवासी 40 ते 45 वर्षांपासून त्या ठिकाणी राहत आहेत. त्यांचे सर्व कागदोपत्री पुरावे याच ठिकाणचे आहेत. कोणताही कायदेशीर तोडगा निघेपर्यत मानवतावादी दृष्टीकोण ठेवून या इमारती उल्हासनगरमधील बांधकामे, कॅम्पाकोला तसेच आदर्श सोसायटी, पिंपरी-चिंचवडमधील बांधकामे यांच्या धर्तीवर नियमित करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना करण्यात आली आहे. इमारतींवरील कारवाईस स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.
संबंधीत इमारतींमधून सुमारे 3500 कुटुंबे आणि त्यामधील 20 ते 25 हजार सदस्यांच्या मनात बेघर होण्याची भिती निर्माण झाली आहे. कुटुंंबांत अबालवृध्द, लहान मुले, विद्यार्थी आहेत. हे रहिवासी प्रचंड मानसिक तणावाखाली असून आत्महत्या किंवा आत्मदहनाचा पर्याय त्यांच्याकडे उरल्याचा घर बचाव संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून या विषयाचे गांभिर्य विशद केले. याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ.संजीव नाईक, आमदार संदीप नाईक आणि दिघा घर बचाव संषर्ष समितीच्या पदाधिकार्यांना दिले.