नवी मुंबई: दिघा येथील अनधिकृत इमारतांविरोधातील कारवाई ‘एमआयडीसी’ने अधीक तीव्र केली असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ५ ऑक्टोबर रोजी ‘एमआयडीसी’च्या अतिक्रमण विरोधी पथकाने या भागातील दोन इमारती आणि दोन गोदाम जमीनदोस्त केले. ‘एमआयडीसी’ने रहिवाशी रहात असलेल्या इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने आणि या कारवाईदरम्यान अनेक रहिवाशांना त्यांच्या सामानासहीत इमारतीबाहेर काढल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. यावेळी रहिवाशांनी आक्रोश करीत ‘आम्ही जायचे कुठे?’ असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनधिकृत इमारती उभ्या करणार्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणार्या ‘एमआयडीसी’च्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणीही रहिवाशांकडून करण्यात येत होती.
या भागातील अनधिकृत इमारतींविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाने या भागातील एकूण ९४ अनधिकृत इमारतीवर ‘एमआयडीसी’ने तत्काळ कारवाई करुन सदरचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सदर कारवाई करताना, नवी मुंबई महापालिकेने ‘एमआयडीसी’ला सहकार्य करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, ‘एमआयडीसी’कडून अनधिकृत इमारतींवर होणार्या कारवाईला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेकडो नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई यावेळी केली. तर ‘एमआयडीसी’ची कारवाई आजही सुरु राहणार आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीतील ठाणे-बेलापूर रस्त्यालगत ‘एमआयडीसी’च्या जागेवर वसलेल्या दिघा येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत.
‘एमआयडीसी’चे पथक प्रचंड पोलीस फौजफाट्यासह दिघामध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिवराम आणि पार्वती या इमारतीत रहात असलेल्या रहिवाशांना तेथून बाहेर काढले. यावेळी स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध सुरु केल्यामुळे ‘एमआयडीसी’च्या पथकाने दुपारपर्यंत आपली कारवाई रोखून धरली होती. मात्र, दुपारनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केल्यानंतर ‘एमआयडीसी’ने शिवराम आणि पार्वती या दोन इमारतींवर कारवाई केली. त्याचप्रमाणे बाजुलाच असलेल्या दोन गोदामांवर देखील कारवाई केली. या कारवाईसाठी २५० पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा पोलीस फौजौफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच १०० हुन अधिक कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
‘एमआयडीसी’चे उपअभियंता चेतन कोळी, कनिष्ठ अभियंता प्रकाश चव्हाण, महापालिकेचे विभाग अधिकारी गणेश आघाव यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई दिवसभर सुरु होती. आज ६ ऑक्टोबरदेखील सदर कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर ‘एमआयडीसी’ने दिघा भागातील ९४ अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्या १८३६ रहिवाशांना घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. गेल्या आठवड्यात ‘एमआयडीसी’च्या अतिक्रमण विभागाने बांधकाम सुरु असलेल्या अवघ्या दोन इमारतींवर कारवाई केली होती. आठवड्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पुन्हा ‘एमआयडीसी’च्या अतिक्रमण विरोधी पथकाने आपली कारवाई तीव्र केली आहे. यावेळी ‘एमआयडीसी’चे अतिक्रमण विरोधी पथक रहिवाशी रहात असलेल्या इमारतांवर कारवाई करणार असल्याने स्थानिक महिला आणि रहिवाशी सकाळपासूनच रस्त्यावर उतरले होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील या आंदोलनात सहभागी करुन घेण्यात आले होते.