नवी मुंबई: घणसोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या नगरसेवकाने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी तळवली भागात राहणार्या नंदु राठोड या शिवसेना कार्यकर्त्याच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना 6 ऑक्टाबर
रोजी पहाटे घडली. या हाणामारीत नंदु राठोड जखमी झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची व राष्ट्रवादी काँग्रेसचा हा दहशतवाद संपविण्याची मागणी स्थानिक शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रबाले पोलिसांनी याप्रकरणी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह एकूण 20 ते 25 कार्यकर्त्यांविरोधात दंगलीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे या घटनेनंतर तळवली भागात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी या परिसरातील बंदोबस्त वाढविला आहे.
या घटनेतील जखमी नंदु राठोड पूर्वी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीमध्ये कार्यरत होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान नंदु राठोड याने शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील आणि नंदु राठोड यांच्यामध्ये धुसफूस सुरु आहे. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लक्ष्मीकांत पाटील यांच्या तळवली भागातील मंडळाचे कार्यकर्ते नवरात्रीची वर्गणी मागण्यासाठी अंडी
विव्रेत्याजवळ गेले होते. यावेळी सदर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंडी विव्रेत्याकडे 25 हजार रुपये वर्गणीची मागणी करुन त्याला पावती देऊन निघून गेले. सदर बाब अंडी विक्रेत्या व्यापार्याने आपल्या ओळखीतल्या नंदु राठोड यांना दुरध्वनीद्वारे सांगितली असता राठोड याने 5 हजार रुपये वर्गणी देण्याबाबत अंडी विव्रेत्याला सांगितले. नंदु राठोड याने वर्गणीच्या प्रकरणात मध्यस्ती करुन अंडी विक्रेत्याची बाजु घेतल्याचा राग आल्याने नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील आणि त्यांचे 20 ते 25 कार्यकर्ते मध्यरात्री नंदु राठोड याच्या तळवली येथील घरावर चाल करुन गेले. यावेळी त्यांनी घरात घुसून नंदु राठोड यांना फुटलेल्या बियरच्या बॉटलने तसेच हाताबुक्यांनी मारहाण केली. यावेळी राठोड यांच्या पत्नीने आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी आरडा-ओरड केल्यानंतर सर्व मारेकरी पळून गेले. यानंतर मारेकर्यांनी सदर भागातील काही मोटारसायकल्स आणि चार चाकी वाहनांची तोडफोड देखील केली.
या प्रकारानंतर नंदु राठोड यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजल्यानंतर पुन्हा विरोधकांनी या परिसरात घुसून धुडघुस घातल्याची तक्रार नंदु राठोड यांनी केली आहे. या तक्रारीनंतर रबाले पोलिसांनी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते सचिन क्षीरसागर, खली कोडसकर, सभा शंकर यादव, हेमंत पाटील, लतिकेश पाटील, निलेश उर्फ कुरड्या, अनिकेत यादव लालु, अभ्या, केवल आदि आरोपींवर दंगलीसह धमकावणे, दहशत निर्माण करणे, जबरी चोरी आदि कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर तळवली भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागातील बंदोबस्तात वाढ केली आहे.
दुसरीकडे नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नंदु राठोड यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीची सोन्याचे मंगळसूत्र लुटल्याचा आरोप राठोड यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.