पनवेल : धरमतर खाडीत मच्छिमारी करणार्या मच्छिमारांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्याकडे केली असून या संदर्भात मच्छीमारांना सर्वत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ना.महेता यांनी दिले आहे.
मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज ना.महेता यांची मुंबईत भेट घेतली. या शिष्टमंडळात पांडुरंग म्हात्रे, रामचंद्र भोईर, चंद्रकांत म्हात्रे, मोहन शिंदे, संतोष ठाकूर, प्रदीप पाटील, महादेव थळे, पांडुरंग कोठेकर, दत्ताराम पाटील, जगन्नाथ म्हात्रे आदींचा समावेश होता. त्यावेळी झालेल्या बैठकीत ना.महेता यांनी मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पेण तालुक्यातील डोलवी येथे धरमतर खाडीच्या बाजूला जेएसडब्ल्यू कंपनी तसेच अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथे पी.एन.पी. कंपनीची जेट्टी असून या ठिकाणी लागणार्या कच्चा मालाची वाहतूक धरमतर खाडीतून करण्यात येते. या दोन्ही प्रकल्पामुळे धरमतर खाडीत मच्छिमारी करणार्या मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी या त्यांच्या सातत्याच्या मागणीनुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक ः मत्स्यवि-1113/प्र.क्र.307/पदूम-14, मंत्रालय, विस्तार, मुंबई दि.9 जुलै 2014 च्या शासन निर्णयाने धरमतर खाडीतील मच्छिमारांच्या समस्यांबाबत अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचा कार्यकाल चार महिन्याचा असून समितीने चार महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक आहे. तरी या समितीमार्फत धरमतर खाडीतील मच्छिमारांच्या समस्यांबाबत अद्यापपर्यंत काय अभ्यास करण्यात आला आहे, याचा अहवाल मागवून घ्यावा व मच्छिमारांना लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळवून द्यावा.