* वाढीव बिले महावितरण एका महिन्यात कमी करणार
* बिलांची होळी करुन अनागोंदी कारभाराचा निषेध
नवी मुंबई : वाढीव वीज बिले कमी करा, नाही तर खुर्च्या खाली करा , अच्छे दिन कुणाचे, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत आज(ता.9) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ऐरोली आणि वाशी येथे महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा आणि सरकारच्या नामुष्कीचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर वाढीव बिलांची होळी देखील करण्यात आली. येत्या एक महिन्यात जर महावितरणने वाढीव बिले कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही तर संपूर्ण नवी मुंबईत महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करीत मीटर जाळो आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखलेे जाणारे युवा आमदार.संदीप नाईक यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर महावितरणने एक महिनाभरात वाढीव बिले कमी करण्याचे त्याचबरोबर नादुुरुस्त मीटरची तपासणी करून नवीन ई मीटर बसविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवित महागाईच्या खाईत लोटणार्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. सर्वसामान्य उपाशी, भाजप तुपाशी असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी केली.
ऐरोली आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना मागील महिन्यात अव्वाच्या सव्वा विद्युत बिले आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संतापाचा पारा अनावर झाला असून याबाबत राष्ट्रवादीने ऐरोली व वाशी येथील महावितरणच्या कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला.यावेळी नगरसेविका शशिकला सुतार, नगरसेविका संगीता पाटील, समाजसेवक दिनेश पारख, माजी नगरसेवक संजय पाटील, समाजसेवक मोहन माने, समाजसेवक संजय पाटील, माजी नगरसेवक महादेव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार आणि ऐरोली तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐरोली येथे कंदील मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक व नगरसेविका आणि पदाधिकारी यांनी ऐरोली सेक्टर-15 येथील गणेश मंदिरापासून महावितरणच्या कार्यालयापर्यंत पायी महावितरणच्या विरोधात घोषणा बाजी करत कंदील हाती घेऊन सरकार आणि महावितरणचा निषेध केला. महावितरणच्या कार्यालयाच्या आवारात देखील कार्यकर्त्यांनी वाढीव बिले भिरकावत महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. महावितरणचे विभागीय उपअभियंता महाजन यांना नागरिकांना येणारी वाढीव बिले, महावितरण करुन नागरिकांच्या माथी मारण्यात येणारी नादुरुस्त(फॉल्टी) मीटर, वारंवार विविध समस्यांबाबत नागरिकांकडून तक्रार देऊनही करण्यात येणारी टाळाटाळ याविषयी उपअभियंता यांना आ.संदीप नाईक आणि जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार व तालुका अध्यक्ष अशोक पाटील व प्रमुख कार्यकर्त्यांनी घेराव घातला. वाढीव बिलासंदर्भात राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्या दणक्याने महावितरणच्या अधिकार्यांना घाम फुटला.अधिकारी महाजन यांनी आत्ताची वाढीव बिले ही सरकारने बिलावरील सन-2014 पर्यंतची सबसीडी पूर्णत: बंद केल्याने आणि बिलामध्ये 30 टक्के वाढ केल्याने येत असल्याचे स्पष्ट केले. ऐरोलीतील नादुरुस्त मीटर, केबल वाहिन्या टाकण्यात न आल्याने होणारा त्रास आणि एका महिलेला दरमाह 350 रुपये येणारे बिल तब्बल 45 हजार रुपये आल्याबाबत आ.नाईक यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. यावर आधी मीटरची तपासणी करुनच बिल पाठविणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी रिडींग वेळेवर घेत नसल्याने त्याचा नाहक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत असल्याबद्दल अधिकार्यांना विचारणा केली असता यापुढे नियोजित तारखेला रिडींग घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी वाढीव बिले जाळून निषेध व्यक्त केला.
वाशीमध्येही डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर डॉ. संजीव गणेश नाईक, आ.संदीप नाईक, सागर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, माजी उपमहापौर भरत नखाते, सभागृह नेते जे.डी.सुतार, युवकचे अध्यक्ष सुरज पाटील, ऐरोलीचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, वाशी तालुका अध्यक्ष विक्रम शिंदे, नगरसेवक रविंद्र इथापे, नगरसेवक शशिकांत राऊत, माजी नगरसेवक वैभव गायकवाड, जयेश कोंडे आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता मनोहर मुंगे, अभियंता संदीप पाटील यांना ऐरोली आणि नवी मुंबई परिसरातील समस्यांचे निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेनंतर कार्यकारी अभियंता मुंगे यांनी वाढीव बिले आणि नादुरुस्त मीटरची तपासणी येत्या एका महिन्यात करुन नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचे अभिवचन दिले. नवी मीटर जोडणी, नागरिकांकडे वेळेवर बिले पोहोचविणे, वाढीव अधिभार कमी करणे, केबल वायरी भूमिगत करणे आदी कामे लवकरच हाती घेणार असल्याचे सांगितले.महावितरणच्या कार्यालया बाहेर देखील कार्यकर्त्यांनी सरकार आणि महावितरणचा निषेध करत बिलांची होळी केली.
****
महावितरणला आज वाढीव बिले व इतर समस्यांबाबत जाब विचारला आहे. नागरिकांच्या समस्या अधिवेशनात देखील मांडल्या जाणार आहेत. महापालिकेकडील महावितरणला खोदकामासाठी आवश्यक असणारे परवाने तातडीने देण्याकरिता महापौरांशी चर्चा केली जाणार आहे. आजच्या आंदोलनाची दखल महावितरण घेईल आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देईल, असा माझा विश्वास आहे. – आ. संदीप नाईक.
****
भाजप सरकारने बिलावरील सबसीडी बंद केल्याने नागरिकांना वाढीव बिले आली आहेत. जर नागरिकांची अशा प्रकारे पिळवणूक होत असेल आणि जर आजच्या आंदोलनानंतरही महावितरणला जाग येत नसेल तर एक महिन्यानंतर मीटर जाळो आंदोलन संपूर्ण नवी मुंबईत करण्यात येईल.अच्छे दिन हे नागरिकांना नाही तर सरकारला आले आहेत, हे आता नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. – डॉ. संजीव गणेश नाईक.