•महिलांची उपस्थिती ‘रेकॉर्ड ब्रेक’ करणारी •संजय आवटेंची मिश्किल टोलेबाजी
•सीमा राऊतांनी दिली सक्षमीकरणाची शपथ •कांतीलाल प्रतिष्ठानच्या उपक्रमांची खमंग चर्चा
पनवेलः कांतीलाल प्रतिष्ठानचा उपक्रम म्हटले की, ओसंडून वाहणारा उत्साह, उत्कर्षाची नांदी आणि रेकॉर्ड ब्रेक करणारी उपस्थिती. गायत्री व्यास निर्मित गायत्री मेकओव्हर आणि कांतीलाल प्रतिष्ठानने महिलांसाठी आयोजित केलेल्या सौदर्यीकरणाच्या नववधू प्रिया मी… या कार्यक्रमाला पनवेलकर महिलांनी नाट्यगृह ओसंडून वाहत होते…
दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक संजय आवटे प्रमुख पाहुणे होते. ‘महिलांनो, आतून उजळून निघा’, असे म्हणताच नाट्यगृहातीलच नव्हे तर महिलांच्या मनामनातील अंधकार क्षणार्धात दूर झाल्याने विज चमकावी तशा महिला चमकल्या आणि लख्ख प्रकाशाच्या साथीने टाळ्यांच्या कडकडाटात आखं नाट्यगृहच वाजत ठेवलं.
कांतीलाल कडू यांच्या मैत्री आणिप्रेमापोटी कार्यक्रमाला आलो असे म्हणत आवटे यांनी त्यांच्या खास शैलीत महिलांना आत्मन्नोतीचा मार्ग दाखविण्याचा प्रयास केला. महिलांनी नटले पाहिजे, सजले पाहिजे पण स्त्री म्हणून महिलांनी न जगता माणूस म्हणून जगले पाहिजे. शरीर ही स्त्रीची कधीच ओळख ठरू नये, तशी ती पुरूषांचीही ओळख न ठरता माणूस हीच ओळख ठरावी, याकरीता आपण महिला सक्षमीकरणासाठी तनिष्काचे प्रयत्न चालविले असल्याचे त्यांनी सांगितले.
राणी मुखर्जीपासून ते थेट एैश्वर्या रॉयपर्यतच्या स्त्रीयांच्या काही गंमती जमती सांगून आवटे यांनी पनवेलकर महिलांना हसते केले. ते म्हणाले एक मात्र करा, काही करा पण हसत रहा, हसणं विसरू नका, लाजा, मुरडा हवं ते करा पण हसत राहा असा मिश्किल सल्ला देत आवटे यांनी महिलांच्या खुललेल्या सौदर्यांत अधिकच भर घातली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. स्वतंत्र शैलीने कार्यक्रम करणार्या प्रतिष्ठानने आतापर्यंत दोन वेळा संयुक्तरित्या कार्यक्रम केले आहेत. ते त्यातील भाव आणि गुणात्मक दर्जा पाहून. भाजप सत्तेत येण्यापूर्वी राष्ट्रीय पक्ष असणार्या भारतीय जनता पार्टीच्या पनवेल शाखेने दोन वर्षापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानच्या संयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तर आज गायत्री व्यास आणि त्यांचे पती विशाल व्यास यांच्या प्रामाणिक मेहनतीमुळे त्यांच्या महिलांसाठीच्या खास कार्यक्रमाला प्रतिष्ठानने साथ दिली.
मुंबई, पुणे, डोंबिवलीच्या धर्तीवर पनवेलची ओळख झाली पाहिजे. तिथे होत असलेले सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम पनवेलमध्ये व्हावे आणि पनवेलचा झेंडा अटकेपार फडकविण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
व्यासपिठावर ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे उपस्थित होते. रसिक श्रोत्यांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिलांच्या आतापर्यंतचे सर्व कार्यक्रमातील उपस्थितीचे रेकॉर्ड ब्रेक करणारी उपस्थिती आणि त्यातही कांतीलाल प्रतिष्ठानचे विनामुल्य कार्यक्रमाची खमंग चर्चा सुरू होती.
गायत्री व्यास यांनी सौदर्यकरणार्या व्याख्येचे परिमाण बदलणारी महिलांच्या चेहर्यावर सजावट केली होती. आकर्षक केशरचना, कान, नाकावर रंगाच्या ओघळत्या छटा आणि त्यातून फुलणारा चेहरा पाहण्यासाठी आणि एकूणच आपणही इतकी सुंदर दिसू शकतो हा जागविणारा आत्मविश्वास महिलांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.
सौदर्याचा साज घेवून व्यासपिठ काबिज करणार्या स्पर्धकांचे पाऊल जेव्हा आदबीने आणि अदाकारीसह पडत होते, तेव्हा साऊंड सिस्टिममधून भारतरत्न लता मंगेशकर, आशाताई भोसले यांनी स्वरबद्ध केलेल्या निवडक गाण्यांचे सूर ऐकायला मिळत होते. त्या सूरात सूर मिसळत महिलाच्या ओठावर ते शब्द झुल्यासारखे झुलत होते… महिला फुलांसारख्या फुलत होत्या… कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत होती.