रायगड : जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणार्या अधिकार्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय.
शुक्रवारी रात्री तहसिलदार महेश सगर यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. अडचणीत येणार असं दिसताच ट्रक चालकानं गाडी न थांबवता सरळ सरळ महेश यांच्या अंगावरच तो ट्रक चढवण्याचा प्रयत्न केला.
परंतु, सगर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रसंगावधान राखत आपले प्राण वाचवले. पण, हा ट्रक मात्र इथून निघून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं पाठलाग करत इंदापूर इथं हा ट्रक पकडण्यात आला.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तेव्हाही वाळू माफियांच्या जमावनं तहलसिलदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यात सक्शन पंपाने अवैध वाळू उपशाचं प्रमाण वाढतंय. याला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तहसिलदार महेश सगर यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांविरूद्ध धडक मोहीम हाती घेतलीय. या दरम्यान दोन लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय. त्यामुळे वाळू माफिया चांगलेच धास्तावलेत.