नवी मुंबई : विविध क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणार्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुणवंतांना महानगरपालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात येत असते. याच अनुषंगाने ऑक्टोबर महिन्याच्या महापालिका सर्वसाधारण सभेत राजमाता जिजाऊ सभागृहात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात मानांकन प्राप्त करणारे पॉवरलिफ्टर विक्रमसिंग अधिकारी आणि जलतरणपट्टू शुभम वनमाळी यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या विक्रमसिंग अधिकारी यांनी आय.पी.सी. पॉवरलिफ्टींग ओपन एशियन चॅँपियनशिप, अल्माटी, कझाकस्तान येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ब्राँझ पदक संपादन केले आहे. तसेच ते ब्राझील येथे होणार्या रिओ पॅरालिम्पिक 2016 स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांस सर्वसाधारण सभेप्रसंगी सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे 11 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील न्युयॉर्क येथे मॅनहटन आयलँड मॅरेथॉन स्विम हे 47 कि.मी. अंतर 8 तास 10 मिनिटांत पूर्ण करुन वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन यांचेकडून ट्रिपल क्राऊन हा बहुमान पटकाविणारे व जागतिक स्तरावर 27 वे स्थान पटकाविणारे भारतातील तिसरे जलतरणपट्टू ठरण्याचा बहुमान मिळविणारे शुभम वनमाळी यांचाही जागतिक उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. यापुर्वीही त्यांनी धरमतर ते गेट वे ऑफ इंडीया हे 33 कि.मी. अंतर 8 तासात, इंग्लिश खाडीचे 31 कि.मी. अंतरर 12 तास 42 मिनिटांत, जिब्राल्टर खाडीचे 18 कि.मी. अंतर 3 तास 16 मिनिटांत आणि नुकतेच ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅटलिना चॅनल हे 31 कि.मी. अंतर 10 तास 42 मिनिटांत पोहून पूर्ण केले आहे.
या दोन्ही गुणवंत क्रीडापट्टूंनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीने नवी मुंबईचा नावलौकिक देशभरात उंचाविल्याने त्यांचा यथोचित सन्मान सभागृह नेते जयवंत सुतार यांनी मांडलेल्या व नगरसेवक व्दारकानाथ भोईर यांनी अनुमोदन दिलेल्या अभिनंदन प्रस्तावानुसार महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते सर्वसाधारण सभेप्रसंगी करण्यात आला.