नवी मुंबई : श्री गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी व त्यानंतरच्या कालावधीतही वसाहती, सोसायट्यांमध्ये मलेरीया/ डेंग्यू आजार नियंत्रणासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम राबविली जात असून आता नवरात्रौत्सवामध्येही मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र जमत असतात हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी यांच्या नियंत्रणाखाली व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.
यात 21 नागरी आरोग्य केंद्रांचे अधिकारी, कर्मचारी आपापल्या क्षेत्रातील वसाहती, सोसायट्यांना तसेच नवरात्रौत्सव मंडळांना भेटी देत असून त्याठिकाणी नागरिकांना एकत्र आणून मलेरीया/डेंग्यू नियंत्रणासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती देत आहेत.
यामध्ये घरात किंवा परिसरातील पाणी साठवून ठेवले असेल किंवा साठले जाऊ शकेल अशी रोजच्या पाहण्यातील किंवा दुर्लक्षित असलेली, जिथे डास उत्पन्न होऊ शकतील अशी ठिकाणे शोधून ते पाणी काढून टाकण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. प्रत्यक्ष डासअळ्या कशा असतात ते दाखविले जात आहे. पाणी भरून ठेवण्याची भांडी स्वच्छ करून पूर्णपणे कोरडी करून ठेवणे, गरजेपुरताच पाणीसाठा एक -दोन दिवसच करणे व त्यातही डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे, घरात किंवा आजुबाजूला कुठेही रूग्ण आढळल्यास नागरी आरोग्य केंद्रास लगेच कळविणे अशाप्रकारे आवाहन करण्यात येत आहे. तसेच यावर्षी कमी पाऊस पडला असल्याने गरजेपुरतेच पाणी वापरावे असे पूरक जलबचत आवाहनही केले जात आहे.
माहितीपर पॅम्प्लेटस्, पोस्टर्स, होर्डींग तसेच प्रचारफेरी, ध्वनीक्षेपक प्रचारवाहन, सोशल मीडिया आणि पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमाद्वारेही जनजागृती करण्यात येत आहे.
याकामी लोकप्रतिनिधींचेही महत्वपूर्ण सहकार्य मिळत असून नुकतेच उपमहापौर अविनाश लाड यांनी पुढाकार घेऊन आपल्या प्रभागातील सोसायट्यांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम राबविली.
मलेरीया / डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव रोखणे ही आपली प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करीत आपल्या घरी, सोसायटीत डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी येणार्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सहकार्य करावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.