मुंबई : कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमधील निष्काळजीपणामुळे जेवायला आलेल्या मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील सर्वच हॉटेलांची झाडाझडती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. त्यामुळे आता मुंबईतील सर्व श्रेणी 2 व श्रेणी 3मध्ये मोडणार्या सर्व हॉटेलांची तपासणी विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे.
विभागातील किमान दहा हॉटेलांची तपासणी दररोज करण्याचे फर्मान आयुक्तांनी सोडले आहेत. या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास हॉटेलांची वीज, पाणी कापून त्यांच्याविरोधात पोलिस कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.
सिटी किनारा हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरची अनधिकृत जोडणी आणि त्यातून झालेली गळती, अरूंद जागा, हवाबंद बांधकाम आदींमुळे चायनीज खायला आलेल्या विद्यार्थ्यांचा हॉटेलमध्येच आगीत होरपळून मृत्यू झाला. या आगीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा आढावा घेऊन भविष्यात असे प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अग्निशमन दलाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, महाराष्ट्र अग्निशमन विभागाचे एम.व्ही.देशमुख, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी आणि उप अग्निशमन अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त मेहतांनी यांनी भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तपासणी मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात व्यापक बनवून विभाग स्तरावर करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक विभागातील किमान दहा हॉटेलांची तपासणी दररोज करण्यात यावी. ती विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल.
ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांचा समावेश असेल. येत्या सोमवारी 19 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.