नवी मुंबई : राज्य मार्ग परिवहन उपक्रम, रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार्या अस्त्रु या संस्थेच्या अखत्यारीत देशातील एकूण 62 शासकीय परिवहन संस्था असून आपल्या अखत्यारित असलेल्या परिवहन संस्थाना बसउद्योग, अत्याधुनिक प्रवासी वाहतुक, बस उत्पादन आणि तंत्रज्ञान, इंधन बचत, प्रवासी सोयी-सुविधा आणि सुरक्षा तसेच बसेसचे सुटे भाग व त्यावरील नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
बदलत्या काळानुसार प्रवासी वाहतुकीसंदर्भात सर्वोत्तम कल्पना राबविल्या जाव्यात व व्यवस्थापन पध्दती आणि अनुषांगिक बाबींबाबत परिवहन उपक्रमामध्ये अधिकाधिक उपयुक्त उपाययोजना सुचविल्या जाव्यात व याचा उपयोग दर्जेदार प्रवासी वाहतुक सेवा पुरविण्यासाठी व्हावा आणि याकामी अस्त्रु संस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केले. असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकींग अर्थात अस्त्रु या संस्थेच्या 241 व्या स्थायी समिती (पुरवठादार व करार) परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते मनोगत व्यक्त करीत होते.
अस्त्रु या संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सहकार्याने या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन अँबीव्हॅली लोणावळा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी देशभरातील 30 शासकीय परिवहन संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, परिवहन समिती सभापती साबु डॅनिअल, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व उपव्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, अस्त्रुचे उपाध्यक्ष तथा गुजरात राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार, अस्त्रुचे कार्यकारी संचालक पी.एस.आनंदराव, अभय दामले आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आपल्या मनोगतात जगात कोणताही सार्वजनिक परिवहन उपक्रम नफ्यात चालत नसून नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास होत असताना अर्बन मोबिलीटीवर विशेष लक्ष पुरवून प्रवासी वाहतुक सेवा अधिक सक्षम व गतिमान करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने स्मार्ट सिटी करीता राज्यातून निवडलेल्या व केंद्र सरकारकडे शिफारस केलेल्या 10 शहरांच्या यादीत नवी मुंबईची निवड जाहीर झाली असून स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने देशातील स्वच्छ शहरात नवी मुंबईला तृतीय क्रमांकाचे मानांकन जाहीर केले. त्याप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमासही दोन उत्कृष्ट प्रोडक्टिव्हीटी पुरस्काराने गौरविण्यात आले. या बाबी निश्चितच भूषणावह असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम जरी काहीसा तोट्यात चालत असला, तरी नवी मुंबई व परिसरातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या व प्रवासीभिमुख समाधानकारक सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. याचेच द्योतक म्हणून परिवहन उपक्रमास सन 2013-14 साठी उत्कृष्ट उत्पादकतेचे दोन पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे ही अभिमानाची बाब असल्याचे स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांनी सांगितले. तसेच प्रवाशांना यापुढेही अधिकाधिक दर्जेदार व विश्वासार्ह सेवा दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला.
परिवहन उपक्रमास येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन परिवहन समिती सभापती साबू डॅनिअल यांनी केले.
याप्रसंगी अतिरिक आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांनी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले व महापालिका व परिवहन उपक्रम राबवित असलेल्या विविध प्रकल्पांचे आणि प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण केले.
नवी मुंबई महानगरपालिका व परिवहन उपक्रमाची वाटचाल व उज्वल भविष्यासाठी या संस्थेने पुढाकार घेऊन परिवहन उपक्रमास प्रकर्षाने भेडसावणार्या अवैध प्रवासी वाहतुक, टोल टॅक्स, डिझेलवरील वॅट, बालपोषण अधिभार तसेच प्रवासी कर कायमस्वरुपी बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याचप्रमाणे अशाप्रकारे वेळोवेळी कार्यशाळा व परिषदांचे आयोजन करुन सर्व सदस्यांनी वैचारिक संवादातून आदान-प्रदान करुन याचा उपयोग परिवहन सेवा सुधारण्यात व्हावा असे आवाहन करीत परिषदेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
पंकजकुमार, पी.एस.आनंदराव, रणजित सिंह देओल व अभय दामले या प्रवासी वाहतुक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींनी सातत्याने त्यांच्या अखत्यारीतील परिवहन संस्थांना बस उद्योग, अत्याधुनिक प्रवाशी वाहतुक, नवनवीन प्रकारची बस उत्पादने आणि तंत्रज्ञान, इंधनबचत, प्रवासी सुखसोयी, त्यांची सुरक्षा व बसेसचे सुटे भाग याबाबत गेली 50 वर्षे अव्याहत यशस्वी मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगत या माध्यमातून विविध स्वरुपाच्या अडीअडचणी सोडविण्याचा अग्रक्रमाने प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट केले. एन.एम.एम.टी. सारख्या एका शहरापुरते मर्यादित असलेल्या संस्थेने या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे समर्थपणे व यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले. परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी आभार प्रदर्शन केले.